रवींद्र जडेजा (Photo Credit: PTI)

IPL 2021, CSK vs KKR: अबू धाबी येथे रोमहर्षक सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) वर एमएस धोनीच्या (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) 2 विकेटने मात आणि आयपीएल 14 च्या प्लेऑफ फेरीतील स्थान निश्चित केले. केकेआर (KKR) विरुद्ध सीएसकेच्या (CSK) या विजयासह प्लेऑफ शर्यत रंगतदार स्थितीत पोहचली आहे. चेन्नईच्या विजयात रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) निर्णायक भूमिका बजावली. जडेजा 8 चेंडूत 22 धावा करून निर्णायक क्षणी सामन्याचा निकाल बदलला. चेन्नईचा 10 सामन्यातील हा आठवा विजय ठरला असून त्यांनी एकूण 16 गुणांसह पॉईंट टेबलमध्ये पहिला क्रमांक गाठला आहे. याशिवाय दिल्ली कॅपिटल्सचे देखील तितक्याच सामन्यात 16 गुण आहेत मात्र, चेन्नई नेट रनरेटने आघाडीवर पोहचली आहे. तसेच कोलकाता चौथ्या स्थानावर कायम आहे. सुपर किंग्ससाठी या सामन्यात फाफ डु प्लेसिसने 43 धावा केल्या तर रुतुराज गायकवाडने 40 धावा केल्या. दुसरीकडे, केकेआरसाठी सुनील नारायणने (Sunil Narine) सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तसेच आंद्रे रसेल, प्रसिद्ध कृष्णा लॉकी फर्ग्युसन आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. (IPL 2021, CSK vs KKR: आपल्या चुकीने Shubman Gill धावचित, युवा फलंदाज व्यंकटेश अय्यरवर असा काढला राग)

आयपीएल 2021 च्या 38 व्या सामन्यात नाईट रायडर्सने दिलेल्या आव्हानात्मक धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी डु प्लेसिस व गायकवाडची सलामी जोडी मैदानात उतरली. दोंघांनी पॉवर-प्लेमध्ये फटकेबाजी करून संघाला धाकड सुरुवात करून दिली. दोघांनी केकेआर गोलंदाजांना धारेवर धरले आणि चौकार-षटकारांचा खेळ सुरू केला. मात्र यानंतर आंद्रे रसेलने चेन्नईला पहिला झटका दिला व तुफान फलंदाजी करणाऱ्या रुतुराजला 40 धावांवर पॅव्हिलियनला पाठवले. गायकवाड बाद झाल्यावरही डु प्लेसिसने जबाबदारीने फलंदाजी करत संघाचे शतक पूर्ण केले. संघाने शंभरी धावसंख्या पार केल्यावर प्रसिद्ध कृष्णाने डु प्लेसिसला माघारी धाडलं आणि संघाला मोठा दिलासा दिला. डु प्लेसिसनंतर काही अंतराने सुनिल नारायणने अंबाती रायडूला त्रिफळाचित केलं. सामन्याला नवीन वळण तेव्हा मिळाले जेव्हा एकाच ओव्हरमध्ये धोनी आणि सुरेश रैना माघारी परतले. पण निर्णायक क्षणी रवींद्र जडेजाने चौकार-षटकार मारून विजय संघाच्या पदरी टाकला.

यापूर्वी केकेआरसाठी तसेच मागील काही सामन्यात मैदान गाजवणारे सलामीवीर शुभमन गिल आणि व्यंकटेश अय्यर आज खास कामगिरी करु शकले नाही. राहुल त्रिपाठी आणि नितीश राणा वगळता इतर फलंदाज अधिक धावा करु शकले नाहीत. त्रिपाठीने सर्वाधिक 45 तर राणाने 37 धावा केल्या. पण अखेरच्या क्षणी दिनेश कार्तिकने 11 चेंडूमध्ये केलेले 26 धावा केकेआरसाठी महत्त्वाचे ठरले आणि संघाने चेन्नईविरुद्ध आव्हानात्मक धावसंख्या गाठली. पण अंतिम क्षणी जडेजाने कोलकाताच्या तोंडून विजयाचा घास काढून घेतला.