IPL 2021 Auction: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतील हे 5 खेळाडू आयपीएल लिलावात आणणार रंगात, मिळू शकते कोटींचे मानधन
केरळ फलंदाज मोहम्मद अझरुद्दीन (Photo Credit: Twitter)

IPL 2021 Auctions Bidding War: देशांतर्गत टी-20 लीग, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचा (Syed Mushtaq Ali Trophy) पहिला आठवडा संपला असून आयपीएल (IPL) फ्रँचायझींसाठी ही चांगली बातमी आहे कारण आगामी इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) लिलावासाठी त्यांच्यासाठी बरेच पर्याय उपलब्ध झाले आहेत. युवा व ज्येष्ठ खेळाडू आगामी हंगामासाठी आयपीएल करार मिळवण्याच्या हेतूने सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्याचा प्रयत्नात आहेत. सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेसह भारताच्या घरगुती हंगामाला सुरुवात झाली. स्पर्धेत आजवर अनेक खेळाडूंनी प्रभावी कामगिरी बजावली आहे ज्यामुळं आगामी आयपीएलच्या लिलावात हे खेळाडू 8 पैकी एका फ्रँचायझीमध्ये स्थान मिळवण्याचे दावेदार आहेत. आज या लेखात आपण जाणून घेणार आहोत अशाच पाच खेळाडूंबद्दल ज्यांनी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये इम्प्रेस केले आणि आगामी आयपीएलच्या लिलावात कोटी रुपयांची बोली आकर्षित करू शकतात. (IPL 2021 Auction: अर्जुन तेंडुलकरसाठी आयपीएल लिलावात या 3 फ्रँचायझींमध्ये रंगू शकते चुरस, मुंबईकर गोलंदाजाला मिळू शकतो चांगला भाव)

1. केदार देवधर (बडोदा):

शनिवारी देवधरने शानदार डाव खेळत बडोद्याला महाराष्ट्रावर 60 धावांनी दमदार विजय मिळवून दिला. त्याने 139 च्या स्ट्राईक रेटने 71 चेंडूत 99 धावा केल्या. सलामीच्या जोडीशी झगडत असलेल्या संघांसाठी 31 वर्षीय अल्पकालीन उपाय ठरू शकेल. आयपीएलमध्ये आपण मोठ्या वयातील खेळाडूंना डेब्यू करताना पहिले आहे अशा स्थितीत केदारसाठी फ्रँचायझींनी बोली लागवल्यास आश्चर्य आटणार नाही.

2. अर्जुन तेंडुलकर (मुंबई):

मोठ्या नावासह मोठ्या जबाबदाऱ्या येतात आणि जुनिअर तेंडुलकरसाठी हे काही वेगळे नाही. 21 वर्षीय अर्जुनने नुकतंच मुंबईच्या ज्येष्ठ संघाकडून पदार्पण केले आणि आता तो आयपीएल करार मिळवण्यासाठी पात्र ठरला आहे. अर्जुनची सुरुवात चांगली झाली नाही मात्र त्याला एक विकेट तरी मिळालीच.

3. विवेक सिंह (बंगाल): 

बंगालचा सलामीवीर फलंदाज विवेक सिंह हा फ्रँचायझींचे लक्ष वेधून घेणारा आणखी एक फलंदाज आहे. ओडिशाविरुद्ध शानदार 50 धावा फटकावल्यानंतर विवेकने झारखंडविरुद्ध 64 चेंडूत शतक ठोकले. मागील दोन सामन्यात त्याने 20 हुन अधिक धावा करत संघाला मजबूत सुरुवात करून दिली आहे.

4. मोहम्मद अझरुदीन (केरळ):

मुंबईविरुद्ध संघाच्या मोठ्या विजयात केरळच्या या युवा खेळाडूने मोलाची भूमिका बजावली. केरळच्या प्रतिभावान अझरुद्दीनने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वात चांगली खेळी करण्याचा पराक्रम केला आहे. 26 वर्षीय याने 37 चेंडूत संयुक्तपणे वेगवान शतक झळकावले. आतापर्यंत तीन सामन्यात त्याने 83.50 च्या सरासरीने 167 धावा केल्या आहेत.

5. पुनीत बिष्ट (मेघालय):

मेघलयाच्या पुनीत बिष्टने मिझोरमविरुद्ध 51 चेंडूत 146 धावा फटकावल्या आणि टी-20 फॉर्मेटमध्ये भारतीयाने केलेल्या दुसऱ्या सर्वाधिक धावा ठोकल्या. आयपीएलमधील अनेक फ्रँचायझी संघात बदल करण्याच्या तयारीत असताना माजी दिल्ली विकेटकीपर-फलंदाज एक उपयुक्त पर्याय सिद्ध होऊ शकतो.

आयपीएलच्या 2021 लिलावापूर्वी मंडळाने शुक्रवारी सर्व फ्रँचायझींना त्यांचे सर्व कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी 20 जानेवारीपर्यंत फायनल करण्याचे आदेश दिले आहे जेणेकरून 21 जानेवारी रोजी घोषणा करता येतील. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलकडून अद्याप तारखांची पुष्टी झाली नसली तरी आयपीएल 2021 चा मिनी लिलाव 11 फेब्रुवारी रोजी आयोजित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.