IPL 2021 Auction Date: आयपीएल 2021 च्या हंगामासाठी कधी होणार खेळाडूंचा लिलाव? 14व्या हंगामापूर्वी मिनी-लिलावाच्या तारखेवर आला मोठा अपडेट
आयपीएल ट्रॉफी (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2021 Auction Date: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) बहुप्रतिक्षित टी-20 स्पर्धेच्या 14व्या हंगामासाठी खेळाडूंच्या लिलावाची तारीख जाहीर केली आहे. यंदाचा लिलाव 18 फेब्रुवारीला होऊ शकतो अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे. परंतु यंदाचा लिलाव कुठे आणि कधी केला जाईल याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. PTIशी बोलताना बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, "यंदाचा लिलाव 18 फेब्रुवारीला होणार आहे. कार्यक्रमाच्या जागेचा निर्णय अद्याप बाकी आहे." स्पर्धेतील सर्व आठ फ्रँचायझी संघांना बीसीसीआयने 20 जानेवारीपर्यंत कायम ठेवलेल्या आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करण्यास सांगितले होते. सर्व संघांकडून एकूण 57 खेळाडूंना रिलीज केले आले तर महत्त्वाच्या खेळाडूंना संघात ठेवण्याचा निर्णय घेतला. खेळाडूंच्या रिटेंशनची अंतिम मुदत 20 जानेवारी रोजी संपली असून 4 फेब्रुवारी रोजी ट्रेडिंग विंडो बंद होईल. (IPL 2021 Auction: आयपीएल 14 साठी ‘या’ 5 खेळाडूंना Retain करणं फ्रँचायझींना पडू शकते महागात)

दरम्यान, यंदाचा आयपीएल भारतात होईल की नाही याबाबत बीसीसीआयने अद्याप निर्णय घेतलेला नसला तरी मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी यापूर्वी स्पर्धा भारतात आयोजित करण्यासाठी सर्व काही केले जाईल असे वारंवार सांगितले आहे. कोविड-19 महामारीमुळे 2020 हंगाम युएई येथे सप्टेंबर-नोव्हेंबर महिन्यात आयोजित करण्यात आला होता. पुढील महिन्यापासून इंग्लंडविरुद्ध भारतात होणाऱ्या मालिकेचे सुरळीत आयोजन झाल्यास टी-20 लीग देशात खेळवण्याचा मार्गही मोकळा होऊ शकतो. स्टीव्ह स्मिथ आणि ग्लेन मॅक्सवेल सारख्या अव्वल ऑस्ट्रेलियन खेळाडूंना अनुक्रमे राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब फ्रँचायझीने बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

दुसरीकडे, फ्रँचायझी संघांनी एकूण 139 खेळाडूंना रिटेन करत 57 खेळाडूंना रिलीज केलं आहे. आणि आता हे 57 खेळाडूंचीही बोली लगावली जाईल. जाहीर झालेल्या खेळाडूंमध्ये राजस्थान रॉयल्सने स्टिव्ह स्मिथला बाहेर केल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. शिवाय, लिलाव होण्यापूर्वीच रॉबिन उथप्पा, डॅनियल सॅम्स आणि हर्षल पटेल अशा 3 खेळाडूंचा ट्रेडिंगद्वारे संबंधित फ्रेंचायझीने अन्य संघाशी व्यवहार केला आहे. भारत-इंग्लंड संघातील मालिका 28 मार्चपर्यंत खेळली जाणार असल्याने आयपीएल 2021 एप्रिल महिन्यात सुरू होईल.