जसप्रीत बुमराहने नेट्समध्ये 'या' 6 गोलंदाजांची केली नक्कल (Photo Credit: Instagram)

इंडियन प्रीमिअर लीगचा (Indian Premier League) 13 वा हंगाम सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहे आणि सर्व टीमने क्वारंटाइन कालावधी पूर्ण करून सराव सत्र सुरु केले आहे. आयपीएलचे वेळापत्रकही (IPL Schedule) जाहीर करण्यात आले आहे. सलामीच्या सामन्यात गेतजेता मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि मागील वर्षाचे उपविजेते चेन्नई सुपर किंग्समध्ये (Chennai Super Kings) लढत पाहायला मिळेल. दोन्ही टीममधील लढत शानदार असण्याची शक्यता आहे कारण दोघांकडे उत्तम दर्जाचे फलंदाज आणि गोलंदाज आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स 4 वेळा आयपीएलचे (IPL) जेतेपद मिळविणारा एकमेव संघ आहे आणि आता टीम पाचवे विजेतेपद जिंकण्यासाठी नेट्समध्ये कसून सराव करत आहे. संघाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर खेळाडूंच्या सरावाचे व्हिडिओ शेअर केले जात आहेत. खेळाडू सरावासह एकमेकांसोबत किंवा कुटुंबासोबत मजा-मस्ती देखील करताना दिसतेय. या दरम्यान, मुंबई इंडियन्सने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात त्यांचा मुख्य वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah)वेगळ्या प्रकारची गोलंदाजी करताना दिसतोय. (IPL 2020: मुंबई इंडियन्सची खराब कामगिरी आणि लसिथ मलिंगा यांच्यामध्ये आहे विशेष संबंध, रोहित शर्माची टीम पुन्हा बनणार चॅम्पियन? वाचा सविस्तर)

या व्हिडिओमध्ये बुमराह नेटमध्ये सहा गोलंदाजांच्या कृतीची नक्कल करताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करताना मुंबई इंडियन्सने चाहत्यांना गोलंदाजांचा अंदाज घेण्यास सांगितले. व्हिडिओमध्ये गोलंदाजी करताना बुमराहला देखील हसू अनावर झाले. यावर त्यांच्या फॉलोअर्सनी देखील अंदाज बांधण्याचा प्रयत्न केला आणि बर्‍याच मजेदार टिप्पण्या केल्या आहेत.

बुमराहने नक्कल केलेला पहिला गोलंदाज लसिथ मलिंगा होता, त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा होता. बुमराहने नंतर भारताचा माजी गोलंदाज आशिष नेहराची शैली आजमावत डाव्या हाताने बॉलिंग करण्याचा प्रयत्न केला जे कदाचित सर्वात वाईट सिद्ध झाले. त्यानंतर त्याने केदार जाधव, अनिल कुंबळे आणि शेन वॉर्न यांच्या शैलीची नक्कल करण्याचाही प्रयत्न केला. बुमराहने महत्त्वाच्या प्रसंगी प्रत्येक वेळी मुंबई इंडियन्सला मदत केली आहे. प्लेइंग इलेव्हनमध्ये तो मुंबई इंडियन्सची पहिली पसंती असेल. बुमराहने मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये आजवर 77 सामन्यात 7.55 च्या इकॉनॉमी रेटने 82 विकेट्स घेतल्या आहेत.