Sunil Narine Bowling Action: KKRच्या सुनील नारायणची बॉलिंग अ‍ॅक्शन बेकायदेशीर, पुन्हा आढळल्यास आयपीएल 2020 मध्ये गोलंदाजी करण्यापासून होईल निलंबित
सुनील नारायणची बॉलिंग अ‍ॅक्शन (Photo Credits: IANS)

Sunil Narine Bowling Action: किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध (Kings XI Punjab) 10 ऑक्टोबर रोजी झालेल्या आयपीएल (IPL0 सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) फिरकी गोलंदाज सुनील नारायणची बॉलिंग अ‍ॅक्शन (Sunil Narine Bowling Action) बेकायदेशीर असल्याचं आढळलं. किंग्स इलेव्हन पंजाब आणि केकेआर यांच्यातील आयपीएल सामना अबू धाबी येथे शनिवारी खेळला गेला. या सामन्यात केकेआरने 164 धावा करून पंजाबसमोर 165 धावांचे आव्हान ठेवले होते, पण अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात केकेआरने (KKR) फक्त 2 धावांनी विजय मिळवला. पंजाबला अखेरच्या ओव्हरमध्ये 14 धावांची गरज होती आणि केकेआरचा कर्णधार दिनेश कार्तिकने त्यांचा अनुभवी फिरकी गोलंदाज सुनील नारायणकडे चेंडू दिला. नारायणने आपल्या कर्णधाराचा विश्वास राखला आणि केकेआरच्या विजयात मुख्य भूमिका बजावली. त्याने 28 धावा देत 2 गडी बाद केले. (KXIP vs KKR, IPL 2020: प्रसिद्ध कृष्णा, सुनील नारायणचा भेदक मारा; केकेआरने 2 धावांनी रोमहर्षक विजय मिळवत केला पंजाबचा खेळ खल्लास)

दरम्यान, ऑन-फील्ड पंचांनी हा अहवाल दिला होता. नारायणला चेतावणी यादीमध्ये स्थान देण्यात येईल आणि तो या स्पर्धेत गोलंदाजी सुरू ठेवू शकतो. तथापि, पुन्हा एकदा दोषी आढळल्यानं कॅरेबियन क्रिकेटपटूला आयपीएल 2020 मध्ये गोलंदाजीपासून निलंबित केले जाईल. आयपीएलने याबाबत निवेदन जरी केले. इंडियन प्रीमियर लीगच्या निवेदनात म्हटले की, "आयपीएलच्या संशयित बेकायदेशीर बॉलिंग अ‍ॅक्शन पॉलिसीनुसार मैदानावरील पंचांनी हा अहवाल तयार केला आहे. नारायणला चेतावणी यादीमध्ये स्थान देण्यात येईल आणि त्याला स्पर्धेत गोलंदाजी करणे सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात येईल." पुढे त्यांनी म्हटले की, पुन्हा आढळ्यास बीसीसीआयच्या सस्पेक्ट बॉलिंग अ‍ॅक्शन कमिटीद्वारे क्लिअर होईपर्यंत नारायणला आयपीएल 2020 मध्ये गोलंदाजीपासून निलंबित केले जाईल.

दरम्यान, नारायणला 2014 पासून त्याच्या अ‍ॅक्शनमुळे त्रास होत आहे. चॅम्पियन्स लीग 2014 स्पर्धेत दोनदा त्याची नोंद झाली आणि त्याच्या अ‍ॅक्शनवर कार्य करत असल्याने 2015 वर्ल्ड कपला देखील त्याला मुकावे लागले होते. 2015 आयपीएलदरम्यानही त्याच्या बॉलिंग अ‍ॅक्शनची नोंद झाली आणि अखेर त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये त्याला गोलंदाजीतून निलंबित करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने एप्रिल 2016 मध्ये आपल्या कारवाईतुन क्लिअर केले पण त्यावर्षी भारतातील टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घेतली.