File Image | Indian Premier League Trophy | (Photo Credits: Twitter @IPL)

सध्या जगभरात कोरोना विषाणूचा (Coronavirus) कहर सुरू आहे. जगातील जवळपास 100 देशांमधील नागरिकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. कोरोना विषाणूमुळे क्रिकेटही प्रभावित होऊ लागले आहे. मद्रास हायकोर्टाने (Madras High Court) आयपीएल (IPL) रद्द करण्याच्या याचिकेवर सुनावणी करताना बीसीसीआयकडे (BCCI) 23 मार्चपर्यंत उत्तर मागितले आहे. आपण यासंदर्भात अधिकाऱ्यांना यापूर्वी विनंती केली होती पण प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली असे याचिकाकर्त्याने सांगितले.  कोरोना विषाणूमुळे 29 मार्च ते 24 मे दरम्यान खेळण्यात येणारा आयपीएल रद्द करण्याची मागणी मद्रास उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेत केली आहे. मात्र, याआधीही कोरोना विषाणूमुळे आयपीएलवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. आतापर्यंत बीसीसीआयकडून मिळालेल्या सिग्नलनुसार मंडळाला कोणत्याही परिस्थितीत ही स्पर्धा आयोजित करण्याची इच्छा आहे. (Coronavirus Outbreak: महिला टी-20 वर्ल्ड कप फायनल सामना पाहायला आलेल्या व्यक्तीला झाली 'कोरोना व्हायरस'ची लागण, MCG ने दिली माहिती)

शनिवारी 14 मार्च रोजी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर इंडियन प्रीमियर लीगच्या गव्हर्निंग कौन्सिलची बैठक बोलविण्यात आली आहे. आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी बुधवारी सांगितले की, बीसीसीआय लवकरच आयपीएलबाबत अंतिम निर्णय घेईल. पटेल म्हणाले की बोर्ड भारतातील कोरोना विषाणूच्या विषयावरसंपूर्ण लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयालयातही आयपीएल रद्द करण्याबाबत याचिका आहे, मात्र, न्यायालयालयाने घाईत सुनावणी घेण्यासाठीची विनंती अस्वीकार केली.

यापूर्वी बुधवारी महाराष्ट्र सरकारचे आरोग्यमंत्री म्हणाले की, राज्य सरकार आयपीएल पुढे ढकलण्यासाठी किंवा मैदानावर प्रेक्षकविना सामने आयोजित करण्यासाठी मंडळाशी चर्चा करीत आहे. मात्र, बीपीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांचे म्हणणे आहे की आयपीएल वेळेवर होईल. कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका रोखण्यासाठी सरकारच्या व्हिसा बंदीमुळे यावर्षी इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळण्यासाठी कोणताही परदेशी खेळाडू 15 एप्रिलपर्यंत उपलब्ध होणार नाही. बीसीसीआयच्या सूत्रांनी गुरुवारी ही माहिती दिली, ज्याने या स्पर्धेच्या भविष्यावर संकट निर्माण झाले आहे.