IPL 2020 Final: केएल राहुलच्या 'ऑरेंज कॅप'ला शिखर धवन याच्याकडून धोका, अव्वल स्थानासाठी DC च्या 'गब्बर'ला इतक्या धावांची गरज
शिखर धवनचे नाबाद अर्धशतक (Photo Credit: PTI)

IPL 2020 Orange Cap: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) सध्याच्या हंगामात ऑरेंज कॅपची शर्यत अतिशय रंजक टप्प्यात पोहोचली आहे. सध्या ऑरेंज कॅप किंग्ज इलेव्हन पंजाबच्या केएल राहुलने (KL Rahul) ऑरेंज कॅप काबीज केली आहे. त्याने आतापर्यंत सर्वाधिक 670 धावा केल्या आहेत. परंतु दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) सलामी फलंदाज शिखर धवन (Shikhar Dhawan) या विक्रमाच्या वेगवान पोहचत आहे. धवनने आतापर्यंत 603 धावा केल्या आहेत. म्हणजेच, आता त्याला ऑरेंज कॅपचा मानकरी बनण्यासाठी फक्त 68 धावांची आवश्यकता आहे आणि त्याचा सध्याचा फॉर्म पाहता दिल्ली कॅपिटल्स फलंदाज सहज हा टप्पा गाठेल असेल दिसत आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील दुसऱ्या क्वालिफायरपूर्वी धवन तिसर्‍या क्रमांकावर होता, तर डेविड वॉर्नर दुसऱ्या स्थानावर होता. या सामन्यात वॉर्नर फ्लॉप झाला, पण धवनने हैदराबादला जबरदस्त दणका दिला. (IPL 2020 Qualifier 2: SRH विरुद्ध तीन चेंडूत 3 विकेट घेऊनही कगिसो रबाडाची हॅटट्रिक हुकली, जाणून घ्या कारण)

धवनने 50 चेंडूत 78 धावांची तुफानी खेळी केली. सध्याच्या आयपीएलमधील धवनचे हे चौथे अर्धशतक होते. त्याने आतापर्यंत 16 सामन्यांत 603 धावा केल्या आहेत. धवनने आयपीएलमध्ये पहिल्यांदा 600 धावांचा टप्पा गाठला आहे. विशेष म्हणजे धवनने यावर्षीही दोन शतके ठोकली आहेत. त्याने दोन डावात सलग शतकं ठोकली आहेत. प्रथम त्याने चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध 101 धावांची खेळी केली आणि त्यानंतर किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध नाबाद 106 धावा केल्या. आयपीएलमध्ये धवनने 600 हुन अधिक धावा करण्याची ही पहिलीच वेळ आहे तर यापूर्वी त्याने 2012 आयपीएलमध्ये 569 धावा केल्या होत्या. धवनने आतापर्यंत 4 वेळा आयपीएलमध्ये 500 हून अधिक धावा केल्या आहेत.गेल्या वर्षी धवनने 521 धावा केल्या होत्या, तर 2016 मध्येही त्याने 501 धावा केल्या होत्या.

दरम्यान, दिल्ली आयपीएल फायनल खेळणार असल्याने धवनकडे राहुलचा विक्रम मोडून ऑरेंज कॅप पटकावण्याची ही सुवर्ण संधी आहे. पण दिल्ली कॅपिटल्सचा सामना चार वेळा आयपीएल चॅम्पियन मुंबई इंडियन्सशी होणार आहे आणि त्यांच्याकडे जागतिक दर्जाचे गोलंदाज आहेत, ज्यांच्यापुढे धवनला यापूर्वी संघर्ष करावा लागला आहे. विशेष म्हणजे यंदाच्या हंगामात दिल्ली आणि मुंबई तीनदा आमने-सामने आले आहेत ज्यात मुंबईने एकतर्फी विजय मिळवला आहे.