IPL 2020 Eliminator: आज नही मार राहा शॉट? विराट कोहलीने मनीष पांडेला केले स्लेज, SRH फलंदाजाने षटकार लगावत RCB कर्णधाराला चपराक लगावली (Watch Video)
विराट कोहलीने मनीष पांडेला केले स्लेज (Photo Credits: Twitter)

SRH vs RCB, IPL 2020 Eliminator: इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League) 2020च्या एलिमिनेटर सामन्यात सनरायझर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) 6 विकेटने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (Royal Challengers Bangalore) पराभव करून दुसऱ्या क्वालिफायरमध्ये स्थान निश्चित केलं. आपल्या पहिल्या विजेतेपदाचं स्वप्न उराशी घेऊन मैदानात उतरलेल्या आरसीबीचं (RCB) पुन्हा एकदा स्वप्न भंगलं. अबु धाबीच्या मैदानावर झालेल्या सामन्यात पराभवासह बेंगलोरचं स्पर्धेतलं आव्हानही संपुष्टात आलं. विजयासाठी दिलेल्या 132 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात हैदराबादकडून केन विल्यमसन-जेसन होल्डरने संयमी फलंदाजी करत संघाचा विजय निश्चित केला. विल्यमसनने नाबाद अर्धशतक झळकावत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. विल्यमसनने नाबाद 50 धावा केल्या तर होल्डरने त्याला नाबाद 24 धावा करत मोलाची साथ दिली. सामन्यादरम्यान दोन्ही संघांच्या खेळाडूंनी रोमांच कायम ठेवला. सामन्यादरम्यान रॉयल चॅलेंजर्सचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) मैदानात आक्रमक दिसला. (IPL 2020 Prize Money: आयपीएल बक्षिसाच्या रकमेत झाली कपात, विजेत्या संघाला ट्रॉफीसह मिळणार 'इतके' कोटी रुपये)

यादरम्यान, विराटने सनरायझर्स हैदराबादचा मधल्या फळीतील फलंदाज मनीष पांडेला (Manish Pandey) स्लेज करण्याचाही प्रयत्न केला. रिद्धिमान साहाच्या हैदराबादच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवलेला श्रीवत्स गोस्वामी बाद झाल्यावर मनीष पांडे मैदानावर आला. पांडेवर दबाव आणण्यासाठी कोहलीने भाष्य करण्यास सुरवात केली. कोहली म्हणाला, 'आज शॉट मारत नाही.' प्रत्युत्तरात पांडेने काहीही न बोलता मोहम्मद सिराजचा डॉट बॉल खेळल्यानंतर लेगच्या बाजूने लांब मोठा षटकार मारला आणि विराटला अप्रत्यक्षपणे चपराक लगावली. मनीषने षटकार मारल्यानंतर पुन्हा कोहलीकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही आणि हे प्रकरण येथे पूर्णपणे शांत झाले.

दरम्यान, आरसीबीचा पराभव करत हैदराबादने दुसऱ्या क्वालिफायरमध्ये स्थान मिळवले असून तिथे त्यांचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होईल. मुंबई इंडियन्सविरुद्ध पहिल्या क्वालिफायरमध्ये पराभूत झाल्यावर दिल्लीला आता फायनल गाठण्याची दुसरी संधी मिळाली आहे, अशा स्थितीत ते विजय मिळवण्याचा सर्वतोपरीने प्रयत्न करतील. तर हैदराबादचा आरसीबीविरुद्ध सामन्यानंतर आत्मविश्वास उंचावला असेल. त्यामुळे, दोन्ही संघातील दुसरा क्वालिफायर मनोरंजक होणार हे नक्की.