अजिंक्य रहाणे (Photo Credit: IANS)

किंग्ज इलेव्हन पंजाबचा (Kings Eleven Punjab) कर्णधार रविचंद्रन अश्विन (R Ashwin) ला आपल्याकडे घेतल्यावर, दिल्ली कॅपिटल्सची (Delhi Capitals) नजर राजस्थान रॉयल्सचा कर्णधार अजिंक्य रहाणेवर (Ajinkya Rahane) होती. भारतीय कसोटी संघाचा उप-कर्णधार रहाणेलाही दिल्ली कॅपिटल्ससोबत खेळायचे होते. अखेर दोघांचेही हे स्वप्न पूर्ण झाले आहे. नुकतेच दिल्ली कॅपिटल्सने ट्वीट करत अजिंक्य रहाणे आपल्या संघात सामील झाला असल्याची अधिकृत माहिती दिली आहे. राजस्थानने रहाणेच्या बदली पत्रावर स्वाक्षरी करून ते दिल्ली कॅपिटल्सकडे पाठविले होते. त्यानंतर आता बीसीसीआयने ही याला मंजुरी दिली आहे.

रहाणेचे मानधन 4 कोटी आहे. रहाणेच्या बदल्यात रॉयल्सला दिल्ली कॅपिटलचे दोन खेळाडू, मयंक मारकंडे आणि राहुल तेवतिया मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. रहाणेला शामिल करण्यासाठी आणि त्याच्या फलंदाजीला अजून मजबूत करण्यासाठी दिल्ली काही महिन्यांपासून रॉयल्सशी चर्चा करीत होती. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली हे गेल्या हंगामात दिल्लीचे सल्लागार होते आणि रहाणेसारखा अनुभवी खेळाडूने त्याच्या संघात असावा अशी त्यांची इच्छा होती. दरम्यान, या महिन्याच्या 8 तारखेला, दिल्ली कॅपिटल्सने आयपीएलच्या पुढच्या आवृत्तीत ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन याच्या संघात शामिल होण्याची अधिकृतपणे घोषणा केली होती. अश्विन शेवटच्या दोन सत्रात पंजाबकडून खेळत होता आणि त्या संघाचा कर्णधारही होता.

दिल्ली कॅपिटल संघातील खेळाडूंकडे नजर टाकली तर त्यांच्याकडे श्रेयस अय्यर, रिषभ पंत, पृथ्वी शॉ, हनुमा विहारी, अवेश खान, अक्षर पटेल, हर्षल पटेल, अंकुश बैन्स, मनजोत कालरा यांसारखे युवा खेळाडू आहेत. याच्याशिवाय शिखर धवन, इशांत शर्मा आणि अमित मिश्रा सारखे अनुभवी टीम इंडियाचे खेळाडूही आहेत. परंतु दिल्ली व्यवस्थापनाची अशी इच्छा होती की भारताय संघातील दोन ज्येष्ठ खेळाडू त्यांच्याकडे असावेत ज्यांच्या कर्णधार आणि खेळाच्या अनुभवाचा फायदा त्यांना होईल. अश्विन आणि रहाणे यामध्ये फिट बसतात.