एमएस धोनी (Photo Credits: Getty Images)

गेल्या वर्षी जुलैमध्ये विश्वचषक (World Cup) संपल्यापासून, महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) याचे टीम इंडिया (Team India) सोबतच्या भविष्यावर सतत चर्चा होत आली आहे. मात्र, धोनीने यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. वर्ल्ड कप सुरु असतानाही धोनी स्पर्धेनंतर निवृत्त होईल असे अनेक अहवालात म्हटले जात होते. तथापि, त्याने खेळापासून काही काळ विश्रांती घेण्याचा मोठा निर्णय घेत सर्वांना आश्चर्यचकित केले. या महिन्यापासून सुरु होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगमधून (आयपीएल) तो क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करणार होता. कोरोना व्हायरसच्या उद्रेकानंतर बीसीसीआयने (BCCI) 15 एप्रिलपर्यंत लीगला स्थगिती देण्यापूर्वी चेन्नईतही लीगचे प्रशिक्षण सुरू केले होते. मात्र, आता वर्ल्ड कप विजेत्या कर्णधाराने क्रिकेटला निरोप घेण्याचे ठरवले आहे. एका अहवालानुसार, बीसीसीआयसोबत अधिकृत बोलणी झाली नसली तरी 38 वर्षीय धोनीने आधीच जवळच्या व्यक्तींसमोर निवृत्तीची योजना उघडकीस केली आहे. (Coronavirus: एमएस धोनी याच्या 1 लाखाच्या मदतीवर नेटिझन्सकडून झालेल्या टीकेनंतर भडकली पत्नी साक्षी सिंह, केला महत्वपूर्ण खुलासा)

“अधिकृतपणे, त्याचे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांशी अद्याप काही बोलणे बाकी आहे, परंतु त्याने आपले मन आपल्या जवळच्या मित्रांसमोर प्रकट केले. जेव्हा वेळ येईल तेव्हा तो हे सर्वांसमोर उघडकीस करेल,” असे एका शीर्ष सूत्राने स्पोर्ट्सकीडाला सांगितले. या अहवालानुसार धोनीच्या निवृत्तीची बातमी या क्षणी येणार नाही कारण आयपीएलमध्ये आपला फॉर्म सिद्ध करायचा आहे. “अन्यथा, त्याने यापूर्वीच निवृत्तीची घोषणा केली असती,” असे सूत्राने नमूद केले.

38 वर्षीय धोनीने वर्ल्ड कपमधील पराभवानंतर टीम इंडियासाठी एकही सामना खेळला नाही. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सेमीफायनल सामन्यात धोनी 50 धावा करुन बाद झाला होता. या स्पर्धे दरम्यान धोनीच्या संथ खेळीवर चाहते आणि विशेषग्यांकडून जोरदार टीका केली जात होती. धोनीच्या नेतृत्वात भारताने 2007 चा टी-20 आणि 2011 मध्ये विश्वचषक आणि 2013 चँपियन्स ट्रॉफीचे जेतेपदही जिंकले आहे. आयसीसीद्वारे आयोजित खेळांचे तीन मोठे जेतेपद जिंकणारा धोनी हा एकमेव कर्णधार आहे.