PC-X

India National Cricket Team vs England National Cricket Team: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ (IND vs ENG) यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला (ENG vs IND 1st ODI 2025) सामना 6 फेब्रुवारी म्हणजेच गुरुवारी नागपूर येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (Vidarbha Cricket Stadium) खेळला जाईल. या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाच्या नेतृत्वाची कमान रोहित शर्माकडे आहे. विशेष म्हणजे वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचे एकदिवसीय संघात पुनरागमन झाले आहे. तर श्रेयस अय्यर देखील संघाचा भाग असेल. युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणा पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी संघासोबत असेल.

तर जसप्रीत बुमराह तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पुनरागमन करेल. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी दरम्यान बुमराहला पाठीला दुखापत झाली होती. परंतु तिसऱ्या एकदिवसीय सामन्यापर्यंत तो पूर्णपणे तंदुरुस्त होईल अशी अपेक्षा आहे. दरम्यान, भारत विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय सामन्यापूर्वी विदर्भ क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी, हेड टू हेड रेकॉर्ड आणि सर्व आकडेवारी जाणून घेऊयात. (Jasprit Bumrah Injury: जसप्रीत बुमराहची फिटनेस टीम इंडियासाठी बनली डोकेदुखी; इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी पोहोचला एनसीएमध्ये)

विदर्भ क्रिकेट स्टेडियमविषयी माहिती

स्टेडियमची क्षमता: विदर्भ क्रिकेट स्टेडियममध्ये सुमारे 45,000 प्रेक्षक एकत्र बसून सामना पाहू शकतात.

एकूण सामने: विदर्भ क्रिकेट स्टेडियममध्ये आतापर्यंत एकूण 11 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत.

प्रथम फलंदाजी करून जिंकलेले सामने: या मैदानावर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने फक्त 3 वेळा विजय मिळवला आहे.

प्रथम गोलंदाजी करून जिंकलेले सामने: गोलंदाजी करणाऱ्या संघाने 8 वेळा विजय मिळवला आहे. त्यामुळे दुसऱ्यांदा फलंदाजी करणे येथे नेहमी फायद्याचे ठरले आहे. सामना जिंकण्याची जास्त शक्यता असते.

पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या: या मैदानावर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 260 आहे. जी स्पर्धात्मक धावसंख्या मानली जाऊ शकते.

दुसऱ्या डावात सरासरी धावसंख्या: दुसऱ्या डावात सरासरी 236 धावा होतात. यावरून असे दिसून येते की संघांना धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी संघर्ष करावा लागतो.

सर्वाधिक धावसंख्या: विदर्भ क्रिकेट स्टेडियमच्या मैदानावर सर्वाधिक धावसंख्या 354/7 (50 षटक) आहे. जी भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध केली आहे.

सर्वात कमी धावसंख्या: सर्वात कमी धावसंख्या 113/10 (37.2 षटक) ही भारतीय महिलांनी इंग्लंड महिलांविरुद्ध केली आहे.

सर्वाधिक धावसंख्या गाठण्यात भारत यशस्वी: या मैदानावर सर्वाधिक धावसंख्या गाठण्याचे लक्ष्य भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 351/4 (49.3 षटक) या धावसंख्येत यशस्वीरित्या पार केले.

सर्वात कमी बचाव धावसंख्या: या मैदानावर यशस्वीरित्या बचाव झालेला सर्वात कमी धावसंख्या 250/10 (48.2 षटकांचा) होता ज्यात भारताने ऑस्ट्रेलियाला हरवले.

खेळाडूने सर्वाधिक धावा: विराट कोहलीने या मैदानावर सर्वाधिक धावा (325) केल्या आहेत. विराटनंतर एमएस धोनी (268 धावा) आणि रोहित शर्मा 204 धावा) यांचा क्रमांक लागतो.

सर्वाधिक विकेट्स: मिशेल जॉन्सन या मैदानावर सर्वाधिक 9 विकेट्स घेऊन अव्वल स्थानावर आहे. तर भारतीय अष्टपैलू रवींद्र जडेजानेही येथे 6 विकेट्स घेतल्या आहेत.