आशियाई खेळ 2023 (Asian Games 2023) 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान चीनमधील हांगझोऊ येथे होणार आहेत. आता बीसीसीआय (BCCI) आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 मध्ये भारतीय पुरुष क्रिकेट संघ आणि महिला क्रिकेट संघ पाठवण्यास तयार आहे. 2010 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत प्रथमच क्रिकेटचा समावेश करण्यात आला. पण भारताने 2010 आणि 2014 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आपला क्रिकेट संघ पाठवला नाही. त्याचबरोबर आशियाई क्रीडा स्पर्धा 2018 मध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आलेला नाही. (हे देखील वाचा: Sunil Gavaskar Slams Selectors: सुनील गावसकर यांची निवडकर्त्यांवर टीका, 'इतरांचे अपयश लपविण्यासाठी चेतेश्वर पुजारा बळीचा बकरा')
बीसीसीआय खेळाडूंची यादी पाठवणार आहे
इंडियन एक्स्प्रेसमधील वृत्तानुसार, मुख्य संघ एकदिवसीय विश्वचषक खेळण्यात व्यस्त असल्याने बीसीसीआय 2023 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पुरुष क्रिकेट संघासाठी एक ब संघ पाठवेल. एकदिवसीय विश्वचषक 2023 5 ऑक्टोबर ते 23 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. त्याचबरोबर महिला क्रिकेट संघाची पूर्ण ताकदीची टीम पाठवली जाईल. बीसीसीआय 30 जूनपूर्वी खेळाडूंची यादी भारतीय ऑलिम्पिक संघटनेला सुपूर्द करेल.
भारत प्रथमच सहभागी होणार आहे
आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच भारत आपला क्रिकेट संघ पाठवत आहे. भारताकडे देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या तरुण खेळाडूंची फौज आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआयला आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी मजबूत संघ पाठवण्यात कोणतीही अडचण येणार नाही. त्याच वेळी, आशियाई खेळापूर्वी, भारताच्या महिला क्रिकेट संघाने बर्मिंगहॅममध्ये 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भाग घेतला होता जिथे त्यांना अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. यापूर्वी भारताने 1998 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आपला पुरुष क्रिकेट संघ पाठवला होता. त्यावेळी मुख्य संघ सहारा कपमध्ये खेळत होता.
टीम इंडिया वनडे वर्ल्डकपच्या तयारीत
2023 च्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी भारतीय संघ पुढील महिन्यात वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार आहे. जिथे टीम इंडिया दोन कसोटी, तीन वनडे आणि पाच टी-20 सामने खेळणार आहे. यानंतर भारतीय संघ आशिया कप 2023 मध्ये सहभागी होणार आहे. त्यानंतर एकदिवसीय विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियन संघ भारतात येणार आहे.