India vs New Zealand 1st T20I: न्युझीलंड संघाकडून भारत 80 धावांनी पराभूत; न्युझीलंडची मालिकेत 1-0 ने सरशी
Rohit Sharma (Photo Credit: Getty Images)

India vs New Zealand 1st T20I:  न्युझीलंड विरुद्ध आजपासून सुरु झालेल्या T20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा 80 धावांनी पराभव झाला. वेलिंग्टनमध्ये (Wellington) रंगलेल्या या सामन्यात न्युझीलंडने भारतापुढे 220 धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र ते गाठण्यात भारताला अपयश आले.

नाणेफेक जिंकत भारताने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. न्युझीलंडने 6 गडी गमावत 219 धावा करत भारतापुढे 220 धावांचे लक्ष्य ठेवले. या सामन्यात हार्दिक पंड्याला दोन विकेट्स घेण्यात यश आले. याशिवाय खलील अहमद, क्रुणाल पंड्या, युजवेंद्र चहल आणि भुवनेश्वर कुमार हे प्रत्येकी एक विकेट घेण्यात यशस्वी झाले.

भारताच्या फलंदाजीची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. अडखळत सुरुवात झालेल्या भारताची पडझड सातत्याने सुरुच होती. रोहित शर्मा अवघ्या एक धावात तर शिखर धवन 29 धावांत माघारी परतला. सलामीवीर जोडी लवकर बाद झाल्यानंतर महेंद्रसिंग धोनी आणि विजय शंकर यांनी अनुक्रमे 39 आणि 27 धावा केल्या. त्यानंतर इतर कोणी फलंदाजीची कमाल दाखवू शकलं नाही. त्यामुळे न्युझीलंडने घालून दिलेले 220 धावांचे लक्ष्य साध्य करणे भारताला शक्य झाले नाही.

तीन सामन्यांच्या या T20 मालिकेत न्युझीलंडने 1-0 ने आघाडी घेतली आहे. या मालिकेतील दुसरा सामना 8 फेब्रुवारीला होणार आहे.