T20 विश्वचषक 2020 स्पर्धेसाठी भारतीय महिला संघाची घोषणा; 15 वर्षीय शेफाली वर्माला संधी, पहा संपूर्ण यादी
India Women's Cricket Team (Photo Credits: Twitter/ @BCCIWomen)

ऑस्ट्रेलिया (Australia) येथे होणाऱ्या आयसीसी महिला विश्वकप टी-20 स्पर्धेसाठी (ICC Women’s T20 World Cup 2020), भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) रविवारी ही माहिती दिली. बीसीसीआयच्या अखिल भारतीय महिला निवड समितीने हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वाखालील 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.

या संघात स्मृती मंधाना उपकर्णधारपदाची धुरा सांभाळतील. त्याचबरोबर बंगालच्या रिषा घोषचा नवीन चेहरा म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे. रिचाने अलीकडेच महिला चॅलेन्जर ट्रॉफीमध्ये 36 चेंडूत 36 धावांची खेळी केली होती ज्यात चार चौकार आणि एक षटकार होता.

आयसीसी महिला विश्व टी -20 स्पर्धेचा 7 वा सीझन ऑस्ट्रेलियामध्ये, 21 फेब्रुवारी ते 8 मार्च 2020 या कालावधीत आयोजित केला गेला आहे. यासाठी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, श्रीलंका आणि बांगलादेशसह भारतीय संघाला ‘अ’ गटात स्थान देण्यात आले आहे. 21 फेब्रुवारी रोजी सिडनी येथे यजमान ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यामधून भारतीय संघ या स्पर्धेला सुरुवात करेल. यानंतर त्यांचा सामना 24 फेब्रुवारीला बांगलादेश, 27 फेब्रुवारीला न्यूझीलंड आणि 29 फेब्रुवारीला श्रीलंकाशी होईल. या स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होतील आणि एकूण 23 सामने खेळले जातील.

टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय महिला संघ: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृति मंधाना (उप-कर्णधार), शेफाली वर्मा, जेमिमा रोड्रिग्ज, हरलीन देओल, दीप्ति शर्मा, वेदा कृष्णमूर्ति, रिचा घोष, तानिया भाटिया, पूनम यादव, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड़, शिखा पांडेय, पूजा वास्त्राकार आणि अरुणधति रेड्डी।

दरम्यान, टी-20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलियामध्ये तिरंगी मालिकेसाठी, निवड समितीने 16 सदस्यीय संघाची घोषणा केली होती. यामध्ये नुज़हत परवीन ही 16 वी सदस्य होती. ही स्पर्धा 31 जानेवारीपासून सुरु हणार आहे.