दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (South Africa Tour) पहिली-वाहिली कसोटी मालिका जिंकण्याचे टीम इंडियाचे (Team India) स्वप्न भंगले. आणि यासह भारतीय संघाने (Indian Team) कसोटी क्रमवारीतील (Test Rankings) आपले नंबर 1 चे सिंहासन देखील गमावले. दक्षिण आफ्रिकेतील (South Africa) 1-2 मालिका पराभवानंतर भारताची दोन स्थानांनी घसरण होऊन तिसर्या क्रमांकावर आली आहे तर ऑस्ट्रेलियाने (Australia) इंग्लंडविरुद्ध अॅशेस मालिकेतील (Ashes Series) वर्चस्वपूर्ण प्रदर्शनामुळे आयसीसी कसोटी संघ क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. इंग्लंडविरुद्ध अथक प्रदर्शनामुळे ऑस्ट्रेलियाने रँकिंगमध्ये दोन स्थानांनी झेप घेतली असून, न्यूझीलंड आणि भारत या दोघांनाही 119 रेटिंग गुणांसह मागे टाकले आहे. पॅट कमिन्सच्या नेतृत्वात संघाने इंग्लंडविरुद्ध ब्रिस्बेन, अॅडलेड, मेलबर्न आणि होबार्ट येथे पहिला, दुसरा, तिसरा आणि पाचवा कसोटी सामना जिंकला. तर पाहुण्या संघाने केवळ सिडनीतील चौथा सामना अनिर्णित करण्यात यश मिळवले. (ICC Test Rankings: कसोटी क्रमवारीत विराट कोहलीची भरारी, जसप्रीत बुमराहसह Kagiso Rabada याला गोलंदाजी क्रमवारीत फायदा)
दरम्यान, सेंच्युरियनमधील पहिल्या कसोटीतील शानदार विजयानंतर दक्षिण आफ्रिकेतील पहिल्या कसोटी मालिकेतील विजयाच्या शोधात असलेल्या भारताला जोहान्सबर्ग आणि केपटाऊनमध्ये एकामागोमाग पराभवाला सामोरे जावे लागले. भारतीय संघ यापूर्वी आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर होता. पण, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका गमावल्याने त्यांना ते स्थान गमवावे लागले आहे. तसेच मालिका विजयानंतर दक्षिण आफ्रिकेने 101 रेटिंग गुणांसह क्रमवारीत 5व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. पहिले जागतिक कसोटी चॅम्पियनशिप विजेते न्यूझीलंडने बांगलादेशविरुद्ध मायदेशात मालिका अनिर्णित केल्यावर 117 रेटिंग गुणांसह क्रमवारीत त्यांचे दुसरे स्थान कायम राखले आहे. बे ओव्हलवरील पहिली कसोटी गमावल्यानंतर किवींनी क्राइस्टचर्चमधील हॅगले ओव्हलमध्ये सर्वसमावेशक कामगिरीसह पुनरागमन केले. पाकिस्तान 93 गुणांसह एका स्थानाने घसरून 6 व्या क्रमांकावर आला आहे.
👊 4-0 #Ashes series winners
📊 Second on the #WTC23 table
🥇 Top-ranked Test team in the world!
Australia's rise to the summit of the MRF Tyres rankings 📈https://t.co/heNbOrq0km
— ICC (@ICC) January 20, 2022
दुसरीकडे श्रीलंका, वेस्ट इंडिज, बांगलादेश, झिम्बाब्वे, अफगाणिस्तान आणि आयर्लंड यांनी क्रमवारीत आपापले स्थान कायम राखले आहे. सांघिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियाचे 119, न्यूझीलंडचे 117 तर भारताचे 116 रेटिंग गुण आहेत.