IND W vs ENG W 2nd ODI: मालिकेत बरोबरीचा भारतीय महिला संघाचा निर्धार, या खेळाडूंवर असणार सर्वांची नजर
भारतीय महिला क्रिकेटर मिताली राज (Photo Credit: Facebook)

IND W vs ENG W 2nd ODI: भारत (India) आणि इंग्लंड महिला (England Women) संघात आज तीन एकदिवसीय सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेचा दुसरा सामना टॉनटॉनच्या (Taunton) कूपर्स असोसिएट्स काउंटी मैदानावर खेळला जाईल. ब्रिस्टलच्या पराभवानंतर आज टॉन्टनमधील विजय खूप महत्वाचा आहे. यजमान इंग्लंड महिला संघ सध्या तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशा आघाडीवर आहे त्यामुळे आजच्या सामन्यात मिताली राजच्या टीम इंडियाचा  (Team India) विजय मिळवून बरोबरी साधण्याचा निर्धार असेल. पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाने 181 डॉट बॉल्स खेळले ज्याच्या परिणाम धावसंख्येवर झाला आणि टीम 201 धावांपर्यंतच मजल मारू शकली. मागील सामन्यात झालेल्या पराभवानंतर भारत या सामन्यात आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल करु शकते. (ICC Women’s ODI Batting Rankings: मिताली राजचा फलंदाजांच्या टॉप-5 मध्ये प्रवेश, Smriti Mandhana हिची 'या' क्रमांकावर घसरण)

पूनम राऊतच्या जागी जेमिमा रॉड्रिगस तिसर्‍या क्रमांकावर मैदानात उतरू शकते. भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध टॉन्टनमध्ये पहिल्या सामन्यातील चुकांची पुनरावृत्ती न करण्याच्या प्रयत्नात असेल. भारतीय महिला संघाने टॉन्टन येथे इंग्लंडविरुद्ध 5 वनडे सामने खेळले असून 2 जिंकले आहेत तर 3 सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. या सामन्यात सर्वांची नजर या खेळाडूंवर असेल.

मिताली राज (Mithali Raj)

शेवटच्या सामन्यात मितालीच्या झुंजार खेळीने टीम इंडियाला 201 धावांपर्यंत मजल मारून दिली होती त्यामुळे आता दुसऱ्या निर्णायक सामन्यातही मितालीकडून मोठी अपेक्षा असेल.

शेफाली वर्मा (Shafali Verma)

हरियाणाच्या शेफाली वर्माने शेवटच्या सामन्यातच एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. यापूर्वी शेफालीने इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यात पदार्पण करताना मागील आठवड्यात 96 आणि 63 धावांची खेळी केली होती. शेफालीचे वनडे पदार्पण अपेक्षेनुसार प्रभावी ठरले नाही पण त्याची कमी भारताची ही तडाखेबाज फलंदाज भरून काढण्याच्या प्रयत्नात असेल.

दीप्ती शर्मा (Deepti Sharma)

अष्टपैलू दीप्ती शर्मानेही पहिल्या एकदिवसीय सामन्यात चांगली फलंदाजी केली परंतु गोलंदाजीत तिला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. या सामन्यात सर्वांची नजर पुन्हा एकदा दीप्तीवर असेल. दीप्तीवर मधल्या फळीत धावा लुटण्याची जबाबदारी असेल.

या तिघींशिवाय उपकर्णधार हरमनप्रीत कौरला देखील कसोटी मालिकेत आणि पहिल्या वनडे सामन्यात फारशी कमाल करता आलेली नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतात झालेल्या मर्यादित ओव्हर मालिकेत कौरची बॅट शांत होती. त्यामुळे आता जर ती फॉर्ममध्ये परतली तर ब्रिटिश संघाविरुद्ध बॅटने कहर करू शकते.