डॅनी व्याट आणि नॅट सायव्हर (Photo Credit: Twitter/ICC)

IND W vs ENG W 3rd T20I: भारतीय महिला संघाला (India Women's Team) इंग्लंड दौऱ्याहून (England Tour) रिकाम्या हाताने घरी परतावे लागणार आहे, कारण एकदिवसीय सामन्यांनंतर यजमान इंग्लंडनेही टी-20 मालिका जिंकली आहे. मालिकेच्या अखेरच्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा (Team India) धुव्वा उडवत ब्रिटिश संघाने 2-1 ने टी-20 मालिका खिशात घातली. तसेच इंग्लंड संघानेही याच फरकाने एकदिवसीय मालिका देखील जिंकली होती. चेल्म्सफोर्ड येथे झालेल्या दौऱ्याच्या अखेरच्या सामन्यात इंग्लंड संघासाठी ओपनर डन्नी व्याटने (Danni Wyatt) चमकदार कामगिरी करत 89 धावांची शानदार खेळी केली. विजयाच्या 154 धावांचा पाठलाग करताना व्याटने दुसऱ्या विकेटसाठी नॅट सायव्हरसह 112 धावांची भागीदारी केली. टॉस जिंकून पहिले फलंदाजी करत टीम इंडियाने 20 षटकांत 6 बाद 153 धावांपर्यंत मजल मारली.

सलामीवीर शेफाली वर्मा आपले खाते उघडू शकली नाही आणि कॅथरीन ब्रंटने तिचा त्रिफळा उडवत तिला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर स्मृती मंधानाने (Smriti Mandhana) 51 चेंडूत 8 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 70 धावा केल्या आणि कर्णधार हरमनप्रीत कौरने तिला साथ देत तिसऱ्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी केली. कौरने 26 चेंडूत 36 धावांची ताबडतोड खेळी केली. अखेरच्या क्षणी रिचा घोषने काही शानदार शॉट्स खेळत संघाला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली. घोषने 13 चेंडू 20 धावांचे योगदान दिले. इतर फलंदाज दुहेरी आकडादेखील ओलांडू शकले नाहीत. इंग्लंडकडून डावखुरा फिरकीपटू सोफी इक्लेस्टोनने चेंडूने प्रभावी कामगिरी बजावली. तिने 35 दावा देत 3 विकेट्स घेतल्या. कॅथरीन ब्रंटला 2 आणि नॅट सायव्हरला 1 विकेट मिळाली. दुसरीकडे, विजयासाठी दिलेल्या धावसंख्येचा पाठलाग करताना ब्रिटिश महिला संघाची सुरुवात देखील खराब झाली.

इंग्लंडने सुरुवातीला टॅमी ब्यूमॉन्टची विकेट गमावली.ब्यूमॉन्ट 11 धावा करून माघारी परतली. यादरम्यान व्यॅटने 33 चेंडूत तिचे आठवे टी-20 अर्धशतक झळकावले आणि आपल्या खेळीत 12 चौकार व एक षटकार खेचला. इंग्लंडच्या विजयात व्याट आणि नताली सायव्हर यांनी 112 धावांची भागीदारी केली आणि उर्वरित काम कर्णधार हेदर नाइटने केले.स्कीव्हरने 36 चेंडूत 42 धावा केल्या, त्यामध्ये 4 चौकारांचा समावेश होता. कर्णधार हेदर नाइटने 6 धावा केल्या. दुसरीकडे भारताकडून दीप्ती शर्मा आणि स्नेह राणा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.