रोहित शर्मा आणि ईशान किशन (Photo Credit: PTI)

IND vs WI ODI 2022: शिखर धवन, ऋतुराज गायकवाड आणि श्रेयस अय्यर या त्रिकुटाला वगळता भारतीय संघातील (Indian team) सर्व खेळाडूंचे आरटी-पीसीआर अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर गुरुवारी नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सराव सुरू केला. मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) संघात सामील झाला असून तो सामन्याच्या दिवशीच उपलब्ध असेल. त्याचे तीन दिवस अनिवार्य क्वारंटाईन सुरू झाले आहे म्हणजेच त्याला सरावाची संधी मिळणार नाही. मयंक अग्रवालनंतर आता संघ व्यवस्थापनाने ईशान किशनचा (Ishan Kishan) वनडेसाठी संघात समावेश केला आहे. भारताला वेस्ट इंडिज (West Indies) विरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका 6 फेब्रुवारीपासून सुरू होईल. एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, “आजचे सत्र हलके व्यायाम होते. खेळाडूंसोबत प्रशिक्षकही होते.” (IND vs WI: टीम इंडियामध्ये कोणा-कोणाला झाली कोरोनाची लागण, आता त्यांच्या जागी कोणत्या खेळाडूंची होणार एन्ट्री, जाणून घ्या सर्व नावे)

माहितीनुसार, विकेटकीपर फलंदाज ईशान किशनचाही ODI संघात समावेश करण्यात आला आहे, जो स्पेशालिस्ट सलामीवीर आहे. त्याला या मालिकेत सलामीवीर म्हणून संधी मिळू शकते. बुधवारी धवन, गायकवाड आणि अय्यर व्यतिरिक्त नेट बॉलर नवदीप सैनीसह इतर 4 लोक देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळले. सैनीचा स्टँडबाय यादीत समावेश आहे. केएल राहुलची वनडे मालिकेसाठी निवड झाली आहे, मात्र तो पहिल्या वनडेत खेळणार नाही. अशा परिस्थितीत रोहितसोबत सलामीला कोण उतरणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. धवन आणि गायकवाडच्या अनुपस्थितीत आता मयंक किंवा ईशान किशन सलामीचा पर्याय उपलब्ध करून देतात.

ईशानची वेस्ट इंडिजविरुद्ध टी-20 मालिकेसाठी टीम इंडियात निवड झाली आहे. त्यामुळे तो पहिल्यापासूनच बायो-बबलमध्ये आहेत. आता त्याचा वनडे संघातही समावेश करण्यात आला आहे. त्याने भारतासाठी दोन एकदिवसीय सामने खेळले असून 30 च्या सरासरीने 60 धावा केल्या आहेत. यामध्ये एका अर्धशतकाचाही समावेश आहे. दुसरीकडे, मयंक अग्रवालबद्दल बोलायचे तर तो संघात सामील झाल्यानंतर तीन दिवस क्वारंटाईनमध्ये आहे. तो आतापर्यंत भारतासाठी पाच वनडे खेळला आहे. यादरम्यान त्याने 17.20 च्या सरासरीने 86 धावा केल्या आहेत. सिडनी येथे 29 नोव्हेंबर 2020 रोजी त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता.