वेस्ट इंडिज (West Indies) दौर्यावर आलेल्या भारतीय संघाला (Indian Team) दहशतवादी हल्ल्याची धमकी मिळाली आहे. याबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) दहशतवादी हल्ल्याचा मेल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला दिली आहे. पाकिस्तानी मीडियाच्या एका वृत्तानुसार, पीसीबीला वेस्ट इंडिज दौर्यावर असलेल्या भारतीय संघावर दहशतवादी हल्ल्याची धमकी देणारा एक मेल आला आहे. पीसीबीने हा ई-मेल बीसीसीआय (BCCI) आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद, आयसीसी (ICC) सोबत शेअर केला आहे. आणि बीसीसीआयने गृह मंत्रालयाला याची माहिती दिली आहे. मात्र, आयसीसी आणि वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने अशा बातम्यांना अफवा म्हटले आहे. (वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघावर आतंकवादी हल्ला होण्याची शक्यता; पाकिस्तानी मिडीयाचा दावा)
बीसीसीआयनेही हे वृत्त फेटाळून लावले आहेत. भारतीय क्रिकेट संघाला कोणताही धोका नसल्याचे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले. “आम्ही यासंर्दभात माहिती एंटीगुआमध्ये असलेल्या भारतीय अधिकाऱ्यांना दिली आहे. त्यांनी सरकारला यासंदर्भात माहिती दिली आहे. दोन्ही संघाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तसेच आयटी सेल ई-मेल कोणी पाठवला याबाबत शोध घेत आहेत.” टेस्ट मालिकेपूर्वी सराव सामन्यासाठी भारतीय संघ अँटिगामध्ये पोहचला आहे.
या दौर्यामध्ये भारतीय संघाने यापूर्वी टी-20 आणि वनडे मालिकेमध्ये विजय मिळवला आहे. दोन्ही संघांमधील 2 सामन्यांची टेस्ट मालिका 22 ऑगस्टपासून सुरू होईल. आणि दुसरा सामना 30 ऑगस्टपासून सुरु होईल. 22 ऑगस्टपासून सुरू होणार्या टेस्ट मालिकेत टीम इंडियाने जर विजय मिळवला तर कॅरेबियन भूमीवर सर्व प्रकारांमध्ये विजय मिळवण्याची ही भारतीय संघाची पहिली वेळ असेल. दरम्यान, भारतीय संघ सध्या अँटिगामध्ये वेस्ट इंडीज ए विरुद्ध 3 दिवसीय सराव सामना खेळत आहे. विंडीजविरुद्ध सराव सामन्यात भारतीय संघाने चांगले प्रदर्शन केले. सराव सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत चेतेश्वर पुजारा याचे शतक आणि रोहित शर्मा याच्या अर्धशतकाच्या मदतीने 297 धावांनी डाव घोषित केला. दुसऱ्या दिवसाखेर, विंडीज एने 94 धावांत 5 गडी गमावले. भारताकडून इशांत शर्मा याने सर्वाधिक 3 बळी घेतले.