IND vs WI 2nd T20I: विराट कोहली याची रोहित शर्माच्या विक्रमाशी बरोबरी, रिषभ पंत बनला भारताचा ‘नंबर एक’ विकेटकीपर; दुसऱ्या टी-20 सामन्यात बनलेले खास रेकॉर्ड पहा
रोहित शर्मा आणि विराट कोहली (Photo Credit: PTI)

IND vs WI 2nd T20I: वेस्ट इंडिज (West Indies) विरोधात दुसऱ्या टी-20 सामन्यात यजमान भारताने (India0 आपल्या वर्चस्वपूर्ण खेळाच्या जोरावर वनडे मालिकेनंतर आता तीन सामन्यांची टी-20 मालिका देखील काबीज केली आहे. माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli), रिषभ पंत आणि अष्टपैलू वेंकटेश अय्यर यांच्या जबरदस्त खेळीच्या बळावर भारताने 186/5धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात विंडीज संघासाठी निकोलस पूरन (Nicholas Pooran) आणि रोवमन पॉवेल यांनी वैयक्तिक अर्धशतकी पल्ला गाठला पण संघाला विजय मिळवून देण्यास ते अपयशी ठरले. पूरन 62 धावा केल्या तर पॉवेल 68 धावा करून नाबाद परतला. या विजयासह रोहित ब्रिगेडने तीन सामन्यांच्या मालिकेत आता 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. या सामन्यात विराट कोहली, रिषभ पंत (Rishabh Pant) यांच्यासह खेळाडूंनी काही खास रेकॉर्डही केले जे खालीलप्रमाणे आहेत. (IND vs WI 2nd T20I: अटीतटीच्या सामन्यात भारताचा 8 धावांनी विजय; वेस्ट इंडिजचा दणदणीत पराभव करत सामन्यासह मालिका खिशात)

1. रिषभ पंत टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक अर्धशतक झळकावणारा यष्टीरक्षक बनला आहे. पंतने दुसऱ्या सामन्यात 27 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकारासह या फॉरमॅटमधील तिसरे अर्धशतक पूर्ण केले आणि एमएस धोनीचा विक्रम मोडला. 98 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या धोनीने या फॉरमॅटमध्ये देशासाठी केवळ 2 अर्धशतके झळकावली आहेत.

2. कोलकाता येथील ईडन गार्डन्स येथे वेस्ट इंडिजविरुद्ध अर्धशतक झळकावून भारतीय फलंदाज विराट कोहली T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 50 पेक्षा जास्त डाव खेळणारा संयुक्त पहिला खेळाडू ठरला. विराटपूर्वी विद्यमान भारतीय कर्णधार रोहित शर्माने 30 वेळा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4 शतके आणि 26 अर्धशतकांसह 50 पेक्षा जास्त धावा खेळले आहेत.

3. वेस्ट इंडिजचा कर्णधार किरोन पोलार्ड आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये 100 सामने खेळणारा विंडीजचा पहिला तर एकूण नववा खेळाडू ठरला. पाकिस्तानचा दिग्गज अष्टपैलू शोएब मलिकने सर्वाधिक 124 टी-20 सामने खेळले आहेत.

4. भारताने विजयासह 100 आंतरराष्ट्रीय टी-20 विजय पूर्ण केले आणि हा टप्पा गाठणारा पाकिस्तान नंतर दुसरा देश बनला. पाकिस्तानने 189 सामन्यांतून 120 विजय मिळवले आहेत, तर भारताने आपल्या 155व्या टी-20 सामन्यात 100 वा विजय मिळवला आहे.

5. पूर्णवेळ कर्णधार झाल्यानंतर रोहित शर्माने मालिकेत विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली आहे. याआधी टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्ध टी-20 आणि वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे मालिका त्याच्या नेतृत्वात काबीज केली.

6. घरच्या मैदानावर टीम इंडियाचा हा सलग सहावा T20 मालिका विजय आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात पराभूत झाला होता. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली होती. त्यानंतर टीम इंडियाने बांगलादेशचा 2-1, वेस्ट इंडिजचा 2-1, श्रीलंकेचा 2-0, इंग्लंडचा 3-2 आणि न्यूझीलंडचा 3-0 असा पराभव केला.

7. भारताने घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध सलग तिसऱ्यांदा टी-20 मालिका जिंकली आहे. कॅरेबियन संघाने पहिल्यांदा 2018 मध्ये भारतीय भूमीवर तीन सामन्यांची मालिका खेळली होती. त्यानंतर टीम इंडियाचा 3-0 असा विजय झाला होता. तसेच 2019 मध्ये भारताने वेस्ट इंडिजचा 2-1 असा पराभव केला.