भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (Photo Credit: PTI)

IND vs WI 2nd T20I: भारत (India) आणि वेस्ट इंडिज (West indies) यांच्यातील कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात यजमान संघाने रोमहर्षक विजय मिळवला. टीम इंडियाने (Team India) पहिले फलंदाजी करून विंडीजसमोर 187 धावांचे विशाल लक्ष्य ठेवले होते. पण निकोलस पूरन (Nicholas Pooran) आणि रोवमन पॉवेल यांची दमदार खेळी व हाती 7 विकेट असूनही पाहुण्या संघाला शेवटच्या षटकात अवघ्या 8 धावा कमी पडल्या. भारताच्या विजयाचे विराट कोहली (Virat Kohli), रिषभ पंत आणि वेंकटेश अय्यर हे तीन नायक ठरले. कोहली आणि पंत यांनी शानदार अर्धशतके झळकावून भारताला आव्हानात्मक धावांपर्यंत मजल मारून दिली. विंडीजसाठी पूरनने 62 धावा केल्या. तर रोवमन 68 धावा आणि किरोन पोलार्ड 3 धावा करून नाबाद परतले. पाहुण्या संघावर या विजयासह भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. (IND vs WI 2nd T20I: दुसऱ्या सामन्यात विराट कोहलीचे विंडीज गोलंदाजांवर वर्चस्व, 30 वे टी-20 अर्धशतक नंतर पाहा काय म्हणाला ‘किंग कोहली’)

भारत दौऱ्यावर पहिल्या विजयासाठी 187 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ब्रेंडन किंग आणि कायल मेयर्सची जोडी वेस्ट इंडिजच्या डावाची सलामी देण्यासाठी मैदानात उतरली. दोघांनी संघाला आश्वासक सुरुवात करून दिली. पण युजवेंद्र चहलने डावातील आपल्या दुसऱ्या षटकांत विंडीज संघाला मोठे झटका दिला आणि मेयर्सला स्वस्तात पॅव्हिलियनमध्ये धाडलं. यानंतर पुढील काही चेंडूनंतर किंग देखील माघारी परतला. भारताचा नवोदित फिरकीपटू रवी बिष्णोईने ब्रॅंडन किंगला 22 धावांत माघारी धाडलं. पण पूरन आणि रोवमन यांनी तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करून संघाच्या विजयाच्या आशा पल्लवित ठेवल्या. मात्र दोघांना धावांसाठी मोक्याच्या क्षणी संघर्ष करावा लागला. अशाप्रकारे पूरनच्या 62 धावा आणि रोवमनच्या नाबाद 68 धावा व्यर्थ ठरल्या. आणि पाहुण्या विंडीजने अटीतटीच्या सामन्यात पराभवासह टी-20 मालिका गमावली. पूरने आपल्या खेळीत 5 चौकार आणि 3 षटकार खेचले.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पहिला T20 आंतरराष्ट्रीय सामना 6 गडी राखून जिंकला. याआधी भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत वेस्ट इंडिजचा 3-0 असा क्लीन स्वीप केला होता. आता दोन्ही संघात 20 फेब्रुवारी रोजी मालिकेचा अंतिम सामना खेळला जाईल, ज्यामध्ये विंडीज संघ एकदिवसीय मालिकेनंतर क्लीन-स्वीप टाळण्यासाठी प्रयत्नशील असेल.