IND vs WI 2nd T20I: भारत (India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या टी-20 सामन्यात 6 विकेटने दणदणीत विजय मिळवला. निकोलस पूरनच्या (Nicholas Pooran) संयमी अर्धशतकी खेळीच्या बळावर पाहुण्या संघाने 157 धावांपर्यंत मजल मारली. तर अन्य खेळाडूंनी भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे गुडघे टेकले. पूरनने एकहाती लढा दिला असतानाही विंडीज संघाला त्यांचा स्टार आणि तडाखेबाज अष्टपैलू जेसन होल्डरची (Jason Holder) कमतरता नक्कीच जाणवली. छातीच्या दुखापतीमुळे होल्डर पहिल्या सामन्यातून बाहेर पडला. सामन्यापूर्वी सराव करताना होल्डरच्या छातीवर मार लागला होता, ज्यातून तो सावरू शकला नाही आणि पहिल्या सामन्यासाठी तो फिट नव्हता. (IND vs WI T20I 2022: विंडीजविरुद्ध पहिली लढाई जिंकली, पण टीम इंडियाला सामन्यादरम्यान बसला जोरदार झटका; वाचा सविस्तर)
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आता 18 फेब्रुवारी रोजी दुसरा सामना खेळला जाणार आहे. आणि त्यापूर्वी विंडीज संघासाठी खुशखबर तर टीम इंडियामध्ये खळबळ उडवणारी बातमी म्हणजे होल्डर आता पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे. कॅरेबियन संघाचा उपकर्णधार निकोलस पूरन याने सांगितले की, जेसन होल्डर आता तंदुरुस्त आहे आणि तो शुक्रवारी दुसरा टी-20 खेळेल. “जेसन होल्डर ठीक आहे, त्याने पुढच्या सामन्यासाठी तयार असले पाहिजे. मला त्याच्या निगलचे तपशील माहित नाहीत, म्हणून मी त्याबद्दल सांगू शकत नाही पण तो उपलब्ध असेल,” पूरनने पुष्टी केली. अशा परिस्थितीत होल्डरच्या परतल्याने विंडीज संघ भारताविरुद्ध एका नव्या जोशाने मैदानात उतरेल.
रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांची दर्जेदार खेळी व रवी बिश्नोईच्या दोन विकेट्सच्या जोरावर बुधवारी ईडन गार्डन्सवर झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा सहा गडी राखून पराभव केला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली असून, दुसरा टी-20 सामना आता याच मैदानावर शुक्रवारी खेळवला जाणार आहे. “सामना निश्चितपणे घसरला, आम्ही प्रामाणिकपणे 10-15 धावांनी कमी पडलो, 170-175 अशा प्रकारच्या ट्रॅकवर अचूक ठरली असती. गोलंदाजांना खरोखरच दोष देऊ शकत नाही, फलंदाज म्हणून आम्हाला आमचा डाव थोडं हुशार असणे आवश्यक होते,” पूरनने व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत म्हटले.