IND vs WI 2nd ODI: ईशान किशन की सूर्यकुमार यादव? KL Rahul च्या परतल्याने कोणाचा होणार पत्ता साफ, कर्णधार रोहित शर्मापुढे मोठा प्रश्न
केएल राहुल आणि रोहित शर्मा (Photo Credit: PTI)

IND vs WI 2nd ODI: वेस्ट इंडिज (West Indies) विरोधात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत यजमान भारत (India) सध्या 1-0 ने आघाडीवर आहे. अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमवर पहिल्या सामन्यात विंडीजचा 6 गडी राखून पराभव केला. विंडीजविरुद्ध सलामीच्या सामन्यातून वैयक्तिक कारणामुळे बाहेर बसलेला सलामी फलंदाज केएल राहुल (KL Rahul) आता भारतीय ताफ्यात सामील झाला आहे. शिखर धवन कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे आणि राहुल गैरहजर असल्यामुळे पहिल्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि ईशान किशनची (Ishan Kishan) जोडी सलामीला उतरली होती. तर सूर्यकुमार यादवचा (Suryakumar Yadav) मधल्या फळीत समावेश करण्यात आला होता. मात्र आता राहुल परतल्यामुळे दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातून ईशान किशन की सूर्यकुमार यादव यांच्यापैकी कोणाचा पत्ता साफ होईल असा प्रश्न सर्वांसमोर उपस्थितीत झाला आहे. (IND vs WI 1st ODI: वेस्ट इंडिजविरुद्ध दमदार विजयालाही परिपूर्ण मानत नाही रोहित शर्मा, सामन्यानंतर दिली अशी प्रतिक्रिया)

पहिल्या वनडे सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, किशनने 36 चेंडूत 28 धावा केल्या. इतकंच नाही तर त्याने कर्णधार रोहित सोबत 13.1 षटकात 84 धावांची मोठी भागीदारी केली. पण राहुलचा विक्रम वेस्ट इंडिजविरुद्ध मजबूत आहे. त्याने 4 एकदिवसीय सामन्यांमध्ये 58 च्या सरासरीने 233 धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि एक अर्धशतकाचाही समावेश आहे. 102 धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. दुसरीकडे, सूर्यकुमार यादव 34 धावा करून नाबाद राहिला. विंडीज गोलंदाजांनी चार विकेट झटपट काढल्यावर यादवने दीपक हुडाच्या साथीने संयमाने फलंदाजी करून संघाला विजयीरेष ओलंडून दिली होती. टी-20 सामन्यांमध्ये संघाचा सलामी फलंदाज राहुल वनडे क्रिकेटमध्ये बहुतांशी मधल्या फळीत चौथ्या-पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करतो पण आता धवन उपस्थितीत नसल्यामुळे राहुल सलामीला उतरताना दिसत आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रोहित शर्माच्या अनुपस्थितीत राहुल ज्येष्ठ सलामीवीर शिखर धवन सोबत सलामीला उतरला होता.

राहुल हा टीम इंडियाचा अनुभवी खेळाडू असून त्याने अनेक सामन्यांमध्ये भारतासाठी चांगली कामगिरी केली आहे. सलामीवीर म्हणून त्याची कामगिरी पाहिली तर तो प्रभावीही ठरला आहे. त्यामुळे ओपनिंगसाठी कर्णधार रोहित राहुलला सोबत घेऊन येण्याची शक्यता अधिक आहे. राहुल हा एकदिवसीय संघाचा उपकर्णधार देखील आहे, त्यामुळे प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याची उपस्थिती अनिवार्य आहे. अशा परिस्थितीत दुसऱ्या वनडे सामन्यात राहुलसाठी कोणत्या फलंदाजाला बाहेर करावे असा मोठा प्रश्न सध्या कर्णधार रोहित शर्मापुढे असेल.