IND vs WI 2nd ODI: कुलदीप यादव याने घेतली हॅटट्रिक, दोन हॅटट्रिक घेणारा ठरला पहिला भारतीय 
कुलदीप यादव (Photo Credit: Getty)

वेस्ट इंडिज (West Indies) विरुद्ध विशाखापट्टणम स्टेडियममध्ये सुरु असलेल्या मॅचमध्ये भारतीय (India) फिरकी गोलंदाज कुलदीप यादव (Kuldeep Yadav) याने हॅटट्रिक घेतली आणि भारताचा विजय निश्चित केला. कुलदीपने 32 व्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर शाई होप, पाचव्या चेंडूवर जेसन होल्डर आणि अखेरच्या चेंडूवर अलझारी जोसेफ याला बाद करत हॅटट्रिक पूर्ण केली. भारताकडून कुलदीपचीही दुसरी हॅटट्रिक होती. दोन हॅटट्रिक घेणारा कुलदीप भारताचा पहिला तर क्रिकेट विश्वातील पाचवा गोलंदाज ठरला. भारताने दिलेल्या 288 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या वेस्ट इंडिज संघाने 8 गडी गमावले आहे आणि भारताला आता विजयासाठी दोन विकेटची गरज आहे. विंडीजकडून होपने सर्वाधिक 78 आणि निकोलस पूरन याने 75 धावांची खेळी केली. एव्हिन लुईस याने 30 धावांचे योगदान दिले.

कुलदीपने 2017 मध्ये ऑस्ट्रेलिया (Australia) विरूद्ध हॅटट्रिकही घेतली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मलिंगामध्ये सर्वाधिक तीन हॅटट्रिक घेतल्या आहेत. त्यानंतर कुलदीप, सकलेन मुश्ताक, चमिंडा वास, वसीम अक्रम आणि ट्रेंट बाउल्ट यांनी दोनदा ही कामगिरी केली आहे. शिवाय, 2019 मध्ये चार भारतीय गोलंदाजांनी हॅटट्रिक केली आहे. कुलदीपच्या आधी जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, दीपक चहर यांनीही हॅटट्रिक केली आहे. कुलदीपने त्याच्या 10 ओव्हरमध्ये 52 धावा देत 3 गडी बाद केले.

2019 च्या आधी भारताने 5 हॅटट्रिक घेतल्या होत्या आणि या वर्षात भारतीय गोलंदाजीने 4 वेळा सलग 3 गडी बाद केले. भारतीय गोलंदाजाने घेतलेली ही सहावी हॅटट्रिक आहे. प्रथम चेतन शर्मा याने 1987 च्या विश्वचषकात हॅटट्रिक घेतली होती. त्यांच्यानंतर कपिल देव, कुलदीप यादव आणि मोहम्मद शमी यांनी ही कामगिरी केली. यंदाच्या विश्वचषकमध्ये शमीने अफगाणिस्तानविरुद्ध सलग 3 बॉलमध्ये विकेट्स घेतल्या होत्या.