भारत (India) आणि वेस्ट इंडीज (West Indies) यांच्यात खेळल्या जाणार्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेच्या पहिल्या आणि शेवटच्या सामन्यासाठी बीसीसीआयने जागांची अदला-बदल केली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) हा बदल केला आहे. 6 डिसेंबरला मुंबईत होणाऱ्या मॅचसाठी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) सामन्यास सुरक्षा देण्यास नकार दिला होता. त्यामुळे, बीसीसीआयने आता 6 डिसेंबरला होणार पहिला टी-20 सामना मुंबईऐवजी हैदराबादमध्ये तर तिसरा आणि शेवटचा सामना हैदराबादऐवजी मुंबईत खेळला जाईल. मुंबई पोलिसांनी यापूर्वी म्हटले होते की 6 डिसेंबरला बाबरी मशीद पडण्याच्या वर्धापनदिन आणि महापरिनिर्वाण दिवस (डॉ. आंबेडकर यांची पुण्यतिथी) मुळे शहर हाय अलर्टवर आहे. बाबासाहेबांचे लाखो अनुयायी दादर येथील चैत्यभूमीवर जमतात, त्यामुळे पोलिसांना सामन्याला सुरक्षा देणे शक्य नाही.
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, "बीसीसीआयने मुंबई आणि हैदराबादमधील सामन्यांच्या तारखांमध्ये बदल करण्यास मान्यता दिली आहे. हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मोहम्मद अझरुद्दीन यांच्याशी सहमत झाल्यानंतर आम्ही हा बदल केला." सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळाच्या बदलांमध्ये एचसीएच्या अध्यक्षांची भूमिका महत्त्वाची ठरली. जर ते तयार झाले नसते तर मुंबईकडून यजमानपद खेचून घेतले गेले असते.
मुंबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर शेवटचा आंतरराष्ट्रीयटी-20 सामना डिसेंबर 2017 मध्ये श्रीलंकाविरुद्ध खेळला गेला होता. मागील वर्षीही वेस्ट इंडीजविरुद्ध वनडे सामना प्रशासकीय कारणास्तव वानखेडे स्टेडियममधून हलविण्यात आला होता. त्यानंतर क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय) ने या सामन्याचे यजमानपद भूषवले होते.
टी-20 मालिकेचे बदललेले वेळापत्रकः
पहिला टी -20 सामना: 6 डिसेंबर, हैदराबाद
दुसरा टी -20 सामनाः 8 डिसेंबर, तिरुअनंतपुरम
तिसरा टी -20 सामनाः 11 डिसेंबर, मुंबई
वनडे मालिकेचे वेळापत्रकः
पहिला वनडे: 15 डिसेंबर, चेन्नई
दुसरा वनडे: 18 डिसेंबर, विशाखापट्टणम
तिसरा वनडे: 22 डिसेंबर, कटक