रोहित शर्मा (Photo Credit: PTI)

IND vs SL 1st T20I: भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यातील पहिला टी-20 सामना लखनऊच्या (Lucknow) भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी स्टेडियमवर खेळला गेला. गुरुवारी झालेल्या पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेचा 62 धावांनी धुव्वा उडवला. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने (Team India) दोन बाद 199 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात श्रीलंका संघ सहा विकेट्स गमावून फक्त 137 धावाच करू शकला. भारताला हा सामना मोठ्या फरकाने जिंकता आला असता, पण भारतीय क्षेत्ररक्षकांच्या खराब कामगिरीमुळे तसे होऊ शकले नाही. या सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षकांनी अनेक सोप्पे झेल सोडले. याबाबत कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) म्हटले आहे की क्षेत्ररक्षण प्रशिक्षक यावर काम करतील. (IND vs SL 1st T20I: पहिल्याच सामन्यात श्रीलंकेची शरणागती, भारताच्या विजयाचा सिलसिला सुरूच; मालिकेत 1-0 ने घेतली आघाडी)

श्रीलंकेविरुद्ध पहिल्या सामन्यात बहुतेक गोष्टी भारताच्या बाजूने गेल्या, तरीही ‘रोहितसेने’च्या क्षेत्ररक्षणाच्या समस्या समोर आल्या. “हे सातत्याने घडत आहे. आम्ही सोपे झेल सोडत आहोत ज्याची या स्तरावर अपेक्षा नाही. आमच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाला काही काम करायचे आहे. आम्हाला यात सुधारणा करून ऑस्ट्रेलियात जायचे आहे, आम्हाला क्षेत्ररक्षणाची चांगली बाजू बनवायची आहे.” तसेच या सामन्यात 89 धावांची धडाकेबाज खेळी करणाऱ्या ईशान किशन याच्यावर कर्णधाराने कौतुकाची थाप दिली. “मी ईशानला बर्‍याच काळापासून ओळखतो. आम्ही आयपीएलमध्ये एकाच फ्रँचायझीसाठी (मुंबई इंडियन्स) खेळतो. मला ईशानची मानसिकता आणि क्षमता माहित आहे. ती लय परत मिळवण्याबद्दल होती आणि त्याला फलंदाजी करताना पाहणे खूप आनंददायक होते,” रोहित सामन्यानंतरच्या सादरीकरण दरम्यान म्हणाला.

दरम्यान, श्रीलंकाविरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेच्या पहिल्या सामन्यात विजय मिळवून टीम इंडियाने सिरीजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता शनिवार, 26 फेब्रुवारी रोजी धर्मशालाच्या HPCA क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येतील. भारतीय संघ एकीकडे आणखी एक मालिका काबीज करण्यासाठी मैदानात उतरेल, तर पाहुण्या श्रीलंकेसाठी हा सामना मालिकेत आव्हान टिकवण्याची अंतिम संधी असेल.