IND vs SL Series 2021: श्रीलंका दौऱ्यावर Rahul Dravid करणार टीम इंडियाचे मार्गदर्शन, BCCI सचिव जय शाह यांची माहिती
राहुल द्रविड (Photo Credit: Getty)

IND vs SL Series 2021: श्रीलंका (Sri Lanka) विरोधात मर्यादित ओव्हरच्या मालिकेसाठी भारताचे माजी कर्णधार राहुल द्रविड (Rahul Dravid) संघाचे प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन करतील याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह (Jay Shah) यांनी पुष्टी केली. शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्वाखालील संघ कोलंबोच्या आर प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर तीन वनडे आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. बीसीसीआयच्या (BCCI) सचिवांनी एएनआयला सांगितले की, “राहुल श्रीलंका मालिकेसाठी संघाचे प्रशिक्षक असतील.” राष्ट्रीय संघातील अनेक खेळाडूंसोबत इंग्लंड दौऱ्यावर असल्यामुळे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री दुसऱ्या टीम इंडिया (Team India) सोबत श्रीलंका दौऱ्यावर जाऊ शकणार नाही ज्यामुळे द्रविड यांना महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. (IND vs SL Series 2021: श्रीलंका दौऱ्यावर ओपनर शिखर धवनला मिळणार नवीन पार्टनर, हे 3 खेळाडू आहेत दावेदार)

दरम्यान, संपूर्ण संघ सोमवारी एकत्रित जमला आहे आणि सात दिवस कडक क्वारंटाईन राहील व त्यानंतर सात दिवसांचे शिथिल आयसोलेश नियमांमध्ये प्रशिक्षण सुरु करतील. तसेच एएनआयने 20 मे रोजी माहिती दिली होती की शास्त्री, भरत अरुण आणि विक्रम राठौर हे तिघेही कसोटी संघासह इंग्लंडमध्ये असल्याने एनसीएचे प्रमुख द्रविड संघाच्या प्रशिक्षकाची भूमिका बजावतील. 2014 मध्ये इंग्लंड दौर्‍यादरम्यान राष्ट्रीय संघाबरोबर फलंदाजी सल्लागार म्हणून काम केल्यानंतर द्रविडचा भारतीय संघाबरोबरची ही दुसरी इनिंग असेल. धवनची टीम इंडिया 28 जून रोजी कोलंबोला रवाना होईल जिथे ते 3 दिवस कडक क्वारंटाईन राहिल्यावर 4 जुलै रोजी मैदानावर सराव करतील. त्यानंतर, 13 जुलै रोजी कोलंबो येथे मालिका सुरू होण्यापूर्वी त्यांना सामान्य प्रशिक्षणाची परवानगी दिली जाईल.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन वनडे आणि तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेचे वेळापत्रक मागील आठवड्यात ठरले आहे. तीन एकदिवसीय सामने 13, 16 आणि 18 जुलै रोजी खेळल्या जातील. 21 जुलै रोजी टी -20 मालिका सुरू होईल, आणि अंतिम दोन सामने 23 व 25 जुलै रोजी खेळले जातील. पृथ्वी शॉने व्हाइट-बॉल संघात पुनरागमन केले आहे तर सलामीवीर फलंदाज देवदत्त पडिक्क्ल आणि रुतुराज गायकवाड यांनाही संघात स्थान देण्यात आले आहे. फिरकीपटू म्हणून वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, राहुल चाहर, के गौथम यांना निवडण्यात आले आहे तर इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) सर्वांना प्रभावित करणारा युवा वेगवान चेतन सकरिया यालाही संघात स्थान मिळवले आहेत.