IND vs SL, Pink-Ball Test: कुलदीप यादव याची एकही सामना न खेळता एक्झिट; Axar Patel याचा समावेश, या खेळाडूच्या बदली मिळू शकते प्लेइंग XI मध्ये एन्ट्री
अक्षर पटेल (Photo Credit: PTI)

बेंगलोर (Bangalore) येथे 12 ते 16 मार्च दरम्यान होणाऱ्या श्रीलंकाविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात (Indian Team) मोठा बदल झाला आहे. लंकन संघाविरुद्ध टी-20 मालिकेनंतर एकही कसोटी सामना न खेळता कुलदीप यादव (Kuldeep Yadav) याला बाहेर करण्यात आले आहे तर स्टार फिरकीपटू अक्षर पटेल (Axar Patel) याचा संघात समावेश करण्यात आला आहे. भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यातील दुसरा कसोटी सामना दिवस/रात्र म्हणजेच गुलाबी बॉलने खेळला जाणार आहे. यापूर्वी मोहाली येथे झालेल्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. अशा परिस्थितीत आता यजमान संघ मायदेशात आणखी एक मालिका काबीज करू पाहत असेल. यापूर्वी न्यूझीलंडविरुद्ध झालेली दोन सामन्यांची मालिका संघाने 1-0 अशी जिंकली होती. (IND vs SL: टीम इंडियाने कोहलीचा 100 वा कसोटी विजय केला साजरा, 'रॉकस्टार' जडेजाने केक कापला)

दरम्यान, कुलदीप यादवचा अक्षरचा बॅकअप म्हणून संघात समावेश करण्यात आला होता. आणि आता अक्षर संघात सामील झाला असून संघ व्यवस्थापन तीन डावखुऱ्या फिरकीपटूंना संघात स्थान देण्याच्या मनस्थितीत नाही. अक्षर आणि कुलदीपप्रमाणे रवींद्र जडेजा देखील डावखुरा फिरकीपटू आहे. अशा स्थितीत केवळ दोन डावखुऱ्या गोलंदाजांना संघात स्थान मिळू शकणार होते. याशिवाय आर अश्विन आणि जयंत यादव देखील फिरकी गोलंदाज म्हणून टीम इंडियात आहेत. त्यामुळे संघ व्यवस्थापनाने कुलदीपला संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला. याशिवाय आता अक्षरला दुसरा सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये देखील परतण्याची शक्यता आहे. पटेलला जयंत यादवच्या (Jayant Yadav) जागी संघात प्रवेश मिळू शकतो. यादव मोहाली कसोटीच्या दोन्ही डावात फारसा प्रभाव पाडू शकला नाही आणि त्याला एकही विकेट मिळाली नाही. तसेच तो बॅटने देखील पहिल्या डावात अपयशी ठरला. अशा परिस्थितीत जयंत यादवला बेंचवर बसणे भाग पडू शकते. ज्यामुळे किवी मालिकेनंतर अक्षरची पुन्हा भारतीय ताफ्यात तिसरा फिरकीपटू म्हणून एन्ट्री होणे निश्चित दिसत आहे. अक्षर बॉल प्रमाणे बॅटने उपयुक्त योगदान देऊ शकतो.

दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), प्रियांक पांचाल, मयंक अग्रवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएस भरत, रवींद्र जडेजा, जयंत यादव, रविचंद्रन अश्विन, सौरभ कुमार, मोहम्मद सिराज, उमेश यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), अक्षर पटेल.