IND vs SL ODI: ड्रेसिंग रूममध्ये Ishan Kishan ने दिलेले आश्वासन मैदानावर येताच केले पूर्ण, Chahal TV वर उघडले आपल्या तुफान बॅटिंगचे रहस्य
ईशान किशन (Photo Credit: PTI)

IND vs SL 1st ODI 2021: श्रीलंका (Sri Lanka) विरोधात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेच्या पहिल्या सामन्यात संजू सॅमसनला (Sanju Samson) प्राधान्य दिले जाणार होता, पण सामन्यापूर्वी त्याला दुखापत झाली आणि त्याला बाहेर बसावे लागले. अशा परिस्थितीत युवा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनचे (Ishan Kishan) नशिब उघडले आणि वाढदिवसाच्या निमित्ताने त्याला वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली ज्याचा त्याने भरपूर फायदा करून घेतला. इशान किशनने पदार्पण सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला आणि अशा प्रकारे एकदिवसीय क्रिकेटमध्ये खाते उघडणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला. चकित करणारी बाब म्हणजे किशनने सामन्यापूर्वी ड्रेसिंग रूममध्ये आपल्या साथीदारांना सांगितले होते की, षटकारासह तो डेब्यू सामन्याची सुरुवात करणार आहे. (IND vs SL 1st ODI: कृणाल पांड्याची ‘ही’ कृती कॅमेर्‍यात कैद, नेटकरी म्हणाले ‘द्रविडच्या इफेक्ट’, पाहा व्हिडिओ)

दुसऱ्या डावात फलंदाजीला येण्यापूर्वी ईशान किशनने ड्रेसिंग रूममधील आपल्या सहकाऱ्यांना सांगितले होते की, तो पहिल्याच चेंडूवर षटकार मारेल मग तो चेंडू कुठेही टप्पा घेवो, तो षटकार खेचणारच. ईशान किशनने बीसीसीआयच्या प्रसिद्ध चहल टीव्हीवर युजवेंद्र चहलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले. किशनने उघड केलेले रहस्य जाणून नक्कीच चकित व्हाल कारण कोणताही फलंदाज आपल्या डेब्यू सामन्यात इतका धोका पत्करत नाही.  या सामन्याबद्दल बोलायचे तर भारताने 7 विकेट्सने जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या ईशान किशनने 42 चेंडूत 59 धावा केल्या, ज्यामध्ये 8 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. ईशान किशनच्या षटकाराबद्दल सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याने त्या चेंडूवर षटकार ठोकला, ज्याच्यापुर्वीच्या चेंडूवर गोलंदाजला पृथ्वी शॉची विकेट मिळाली. तसेच पुढच्याच चेंडूवर त्याने चौकारही लगावला.

युएई आणि ओमान येथे आयोजित होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या दृष्टीने श्रीलंका मालिका अनेक युवा व अनुभवी खेळाडूंसाठी महत्वाची मानली जात आहे. यामध्ये शिखर धवन, सूर्यकुमार यादव, युजवेंद्र चहल, ईशान किशन आणि कुलदीप यादव यांच्यासारख्या मर्यादित ओव्हरच्या धाकड खेळाडूंचा समावेश आहे.