IND vs SL 3rd T20I: संजू सॅमसन याने श्रीलंकाविरुद्ध टीम इंडियाच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवत नोंदवला अनोखा रेकॉर्ड
संजू सॅमसन (Photo Credit: Twitter/BCCI)

विकेटकीपर-फलंदाज संजू सॅमसन (Sanju Samson) याने श्रीलंके (Sri Lanka) विरुद्ध तिसऱ्या आणि अखेरच्या टी-20 सामन्यासाठी भारताच्या (India) प्लेयिंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवत दोन सामन्यांमध्ये न खेळण्याचा एक नवीन भारतीय विक्रम नोंदवला आहे. हरारे येथे 19 जुलै 2015 रोजी सॅमसनने झिम्बाब्वेविरुद्ध एकमेवआंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळला होता. यानंतर त्याला संधी मिळाली नाही. दरम्यान, भारताने 73 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले आहेत आणि आज सॅमसनला संधी देण्यात आली आहे. अशा प्रकारे दोन सामन्यांमधील सर्वाधिक सामन्यांमधून बाहेर राहणार सॅमसन पहिला खेळाडू ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम 2012 ते 2018 दरम्यान 65 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने न खेळणार्‍या उमेश यादव (Umesh Yadav) याच्या नावावर होता. त्याच्यानंतर दिनेश कार्तिक 56 आणि मोहम्मद शमी 43 सामन्यासह अनुक्रमे तिसरा आणि चौथा नंबर आहे. (IND vs SL 3rd T20I: केएल राहुल-शिखर धवन यांची जबरदस्त फलंदाजी, टीम इंडियाचे श्रीलंकेला 202 धावांचे विशाल लक्ष्य)

सॅमसनला मात्र या संधीचा फायदा घेता आला नाही आणि तो 6 धावांवर बाद झाला. त्याने फलंदाजीला येताच लक्षण संदकनच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. पण तो धनंजय डी सिल्वा याच्या चेंडूवर एलबीडब्ल्यू बाद झाला. त्याच्या साडेचार वर्षाची प्रतीक्षा अवघ्या दोन चेंडूंमध्ये संपुष्टात आली. श्रीलंकेविरुद्ध मालिकेच्या अखेरच्या सामन्यात त्याला विकेटकीपर फलंदाज म्हणून स्थान मिळाले, तर पंतला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर केले गेले. 19 जुलै 2015 रोजी सॅमसनने झिम्बाब्वेविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये पदार्पण केले. झिम्बाब्वेविरुद्ध सॅमसनने 24 चेंडूत 1 चौकारांच्या मदतीने 19 धावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राईकरेट 79.17 होता, जो कि इतके चेंडू खेळूनही कमी आहे. झिम्बाब्वेविरुद्ध भारतीय संघाने गमावलेला हा एकमेव सामना आहे.

श्रीलंकाविरुद्ध या सामन्यासाठी भारतीय संघाने एकूण 3 बदल केले. पंतच्या जागी संजू, कुलदीप यादवच्या जागी युजवेंद्र चहल आणि मधल्या फळीतील फलंदाज मनीष पांडे याला अष्टपैलू शिवम दुबेच्या जागी संधी देण्यात आली. पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर शुक्रवारी खेळल्या जाणार्‍या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 6 बाद 201 धावा केल्या.