IND vs SL 3rd ODI: अखेरचा सामना गमावला, पण टीम इंडियाने मालिका जिंकली; तिसऱ्या वनडेत श्रीलंकाने 3 विकेट्सने मारली बाजी
अविष्का फर्नांडो (Photo Credit: PTI)

IND vs SL 3rd ODI 2021: भारताविरुद्ध (India) आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या व अंतिम वनडे सामन्यात श्रीलंकेने (Sri Lanka) 48 चेंडू शिल्लक असताना 3 विकेट्सने सामना जिंकला. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेच्या अखेरच्या सामन्यात भारतीय संघाने (Indian Team) अंतिम सामना गमावला असला तरी 2-1 अशी मालिका खिशात घातली. संघाचा अनुभवी सलामीवीर शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्वातील टीम इंडियाला (Team India) पहिला पराभव तर पहिला मालिका विजय ठरला आहे. यजमान श्रीलंकेच्या विजयात सलामी फलंदाज अविष्का फर्नांडोने (Avishka Fernando) 76 धावांची अर्धशतकी खेळी केली. भानुका राजपक्षेने 65 धावा केल्या तर चरिथ असलंकाने 24 धावांचे योगदान दिले. रमेश मेंडिस धावा करून नाबाद राहिला. दुसरीकडे, भारताला गचाळ क्षेत्ररक्षणामुळे पराभवाला सामोरे जावे लागले. भारतासाठी पदार्पणवीर दीपक चाहरला (Deepak Chahar) 3 तर चेतन सकारियाने 2 गडी बाद केले. तसेच कृष्णप्पा गौथम, व हार्दिक पांड्या यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली. (IND vs SL 3rd ODI 2021: टॉस जिंकल्यानंतर शिखर धवनने ‘कबड्डी शैली’मध्ये साजरा केला आनंद, काही वेळातच व्हिडिओ व्हायरल)

पावसाने सामन्यात व्यत्यय आणल्यामुळे दोन्ही संघात 47 ओव्हरचा सामना खेळण्यात आला. दरम्यान, पहिले फलंदाजी करून श्रीलंकेला दिलेल्या 226 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात यजमान संघाची सुरुवात काही चांगली झाली नाही. श्रीलंकेचा सलामीवीर मिनोद भानुकाला कृष्णप्पा गौथमने 7 धावांवर माघारी धाडलं आणि कारकिर्दीतला पहिला बळी मिळवला. मात्र, फर्नांडो आणि राजपक्षे यांनी यजमान संघासाठी विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु केली. दोघांनी शतकी भागीदारी केली. या दरम्यान, फर्नांडो आणि राजपक्षे यांनी अर्धशतकी धावसंख्या पार केली. दोघे यजमान संघाला मालिकेतील पहिला विजय मिळवून देतील असे दिसत असताना कारकिर्दीतला पहिलाच सामना खेळणाऱ्या सकारियाने राजपक्षेला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. यानंतर सकारियाने धनंजय डी सिल्वाला अवघ्या 2 धावांवर बाद करत वैयक्तिक दुसरा बळी मिळवला आहे. पण श्रीलंकन फलंदाजांनी सावध फलंदाज करून संघाला अखेर विजयीरेष ओलांडून दिली. आजच्या सामन्यात भारतीय खेळाडूंकडून खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. संघाने तब्बल चार महत्वपूर्ण झेल सोडले. हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर चरीत असलंका 24 धावांवर बाद झाला. वनडेत पदार्पण करणाऱ्या राहुल चाहरने लंकन कर्णधार दासून शनकाला शून्यावर माघारी धाडलं.

यापूर्वी, भारताकडून उत्कृष्ठ सुरुवात करणारा सलामीवीर पृथ्वी शॉचे अर्धशतक हुकले. कर्णधार शिखर धवन 13 धावांवर बाद झाल्यानंतर संजू सॅमसन याच्या साथीने संघाला शंभरी पार करून देणारा पृथ्वी अर्धशतकाला 1 धाव शिल्लक असताना बाद झाला. तर संजू देखील 46 धावांवर बाद झाला. अवघ्या 225 धावांत भारतीय संघ गारद झाला.