IND vs SL 2nd ODI: भुवनेश्वर कुमार याचा मोठा विक्रम तुटला, श्रीलंकेविरुद्ध एका चुकीने बिघडवले गणित
भुवनेश्वर कुमार (Photo Credit: Twitter)

IND vs SL 2nd ODI: कोलंबो येथे भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना खेळला जात असून टीम इंडिया (Team India) पुन्हा एकदा पहिले गोलंदाजी करीत आहे. सामन्यादरम्यान भारतीय वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचा (Bhuvneshwar Kumar( मोठा विक्रम मोडला गेला. श्रीलंकेच्या डावा दरम्यान भुवीने पाचव्या ओव्हरमध्ये नॉन बॉल टाकला. अशाप्रकारे भुवीने एका चूकीमुळे सहा वर्षांची मेहनत पाण्यात घातली आहे. यासह, गेल्या सहा वर्षांपासून वनडे क्रिकेटमध्ये नो बॉल न टाकण्याची त्याची प्रथा संपुष्टात आली. या सामन्यापूर्वी भुवीने ऑक्टोबर 2015 मध्ये अखेरच्या एकदिवसीय सामन्यात नो बॉल टाकला होता. त्यानंतर तो गोलंदाजी करताना त्याने एकदाही लाईन ओलांडली नाही आणि चेंडू फलंदाजाच्या कमरेच्या वर फेकला गेला नाही. (IND vs SL 2nd ODI 2021: युझवेंद्र चहलचे श्रीलंकेला एकाच ओव्हरमध्ये दोन झटके)

भुवनेश्वर कुमारने एकही नो-बॉल न टाकता वनडे क्रिकेटमध्ये सलग 515.6 ओव्हर म्हणजे 3093 चेंडू फेकले. भुवनेश्वर कुमार एक शिस्तबद्ध गोलंदाज आहे. तो लाईनमधून कमी विचलित होतो त्यामुळे अतिरिक्त धावा कमी देतो. इतकंच नाही तर टी-20 क्रिकेटमध्येही भारताकडून एकही चेंडू न टाकता सर्वाधिक चेंडू टाकण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. त्याने कोणतेही बॉल न टाकता 1034 चेंडू म्हणजेच सुमारे 172 ओव्हर गोलंदाजी केली आहेत. यावरून हे स्पष्ट होते की भुवी बरीच शिस्तबद्ध गोलंदाजी करतो आणि फलंदाजाला नो-बॉलद्वारे धावा लुटू देत नाही. दरम्यान, श्रीलंकेविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात भुवनेश्वर कुमारला एकही विकेट मिळाली नाही. तसेच तो महागडा देखील ठरला होता. श्रीलंका दौर्‍यावर भुवी हा भारतीय संघाचा उपकर्णधारही आहे.

भुवीच्या करिअरबद्दल बोलायचे तर त्याने आतापर्यंत भारतासाठी 21 टेस्ट, 118 वनडे आणि 8 टी-20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने अनुक्रमे कसोटी क्रिकेटमध्ये 63 विकेट्स, वनडेमध्ये 138 आणि टी-20 मध्ये 45 फलंदाजांना माघारी धाडलं आहे. अलीकडच्या काळात तो दुखापतीमुळे त्रस्त झाला होता. यामुळे त्याच्या फॉर्मवरही परिणाम झाला. ऑगस्ट 2019 मध्ये दुखापतीनंतर भुवीने यंदा मार्च महिन्यात इंग्लंडविरुद्ध भारतीय संघात पुनरागमन केलं आहे.