IND vs SL 2nd ODI 2021: असलंका-फर्नांडोचा तडाखेदार बॅटिंग, श्रीलंकेचे धवन ब्रिगेडला विजयासाठी 276 धावांचे टार्गेट
टीम इंडिया (Photo Credit: PTI)

IND vs SL 2nd ODI 2021: कोलंबोच्या (Colombo) आर. प्रेमदासा स्टेडियमवर सुरु असलेल्या दुसऱ्या वनडे यजमान श्रीलंका (Sri Lanka) फलंदाजांनी पुन्हा एकदा निराशाजनक कामगिरी केली आणि निर्धारित 50 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 275 धावांपर्यंत मजल मारली. अशाप्रकारे शिखर धवनच्या भारतीय संघाला (Indian Team) विजयासाठी 276 धावांचं टार्गेट मिळाले आहे. चरिथ असलंकाने (Charith Asalanka) सर्वाधिक 65 धावांची खेळी केली तर सलामी फलंदाज अविष्का फर्नांडोने (Avishka Fernando) 50 धावा केल्या. त्याचबरोबर धनंजया डी सिल्वाने 32 धावांचे योगदान दिले. चमिका करुणारत्ने (Chamika Karunaratne) 44 धावा करून नाबाद परतला. दुसरीकडे, भारतीय गोलंदाजांनी विशेषतः युजवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) आपल्या फिरकीची जादू दाखवत लंकन फलंदाजांवर दबाव आणला. चहल आणि भुवनेश्वर कुमारने (Bhuvneshwar Kumar) प्रत्येकी 10 ओव्हरमध्ये एकूण 3 फलंदाज बाद केले. शिवाय, दीपक चाहरला 2 विकेट मिळाली. (IND vs SL 2nd ODI: भुवनेश्वर कुमार याचा मोठा विक्रम तुटला, श्रीलंकेविरुद्ध एका चुकीने बिघडवले गणित)

टॉस जिंकून श्रीलंकन संघासाठी फर्नांडो आणि मिनोद भानुकाच्या सलामी जोडीने पुन्हा एकदा आश्वासक सुरुवात करून दिली. दोघांमध्ये 77 धावांची भागीदारी झाली. बऱ्याच प्रतिक्षेनंतर चहलने संघाला एकाच ओव्हरमध्ये दोन यश मिळवून देत भानुकाला 36 धावांवर माघारी धाडलं. भानुका पाठोपाठ चहलने ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर भानुका राजपक्षेला शून्यवत पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. यांनतर डी सिल्वा आणि फर्नांडोने संघाला शंभरी पार करून दिली. यादरम्यान, सलामीवीर फर्नांडोने उत्कृष्ठ सलामीवीराची भूमिका पार पाडत अर्धशतक ठोकले पण अर्धशतक करून उपकर्णधार भुवनेश्वर कुमारच्या चेंडूवर बाद झाला. त्याच्या पाठोपाठ संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न करत असलेला डी सिल्वा देखील 32 धावा करुन बाद झाला. श्रीलंकन कर्णधार शनाकाला बाद करत चहलने सामन्यातील तिसरा वैयक्तीक विकेट काढली.

दीपक चाहरने 40 व्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर उत्कृष्ठ असा स्वींग बॉल टाकत वाहिंदू हसनरंगा याला 8 धावांवर बाद केले आहे. अखेरच्या क्षणी एका मागोमाग एक फलंदाज बाद होत असताना असालंकाने भारताविरुद्ध आपले पहिले आंतरराष्ट्रीय अर्धशतक ठोकले आणि संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. दुसरीकडे, तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत धवन ब्रिगेड सध्या 1-0 अशा आघाडीवर आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकून भारतीय संघ मालिका खिशात घालण्याच्या निर्धारित असेल.