IND vs SL 2021: भारत-श्रीलंका मालिकेच्या नवीन तारखांची घोषणा, जाणून घ्या कधी खेळला जाणार पहिला वनडे
भारत-श्रीलंका मालिका (Photo Credits: Facebook)

IND vs SL 2021: श्रीलंका क्रिकेट संघाच्या (Sri Lanka Cricket Team) सदस्यांना कोरोनाची (Coronavirus)लागण झाल्यामुळे भारताविरुद्ध (India) सहा सामने पाच दिवस, म्हणजे 18 जुलैपर्यंत लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतण्यात आला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह (Jay Shah) यांनी शनिवारी वृत्तसंस्था पीटीआयला याबाबत पुष्टी केली. कोलंबो येथे 13 जुलै रोजी होणारा पहिला सामना आता 17 जुलै रोजी खेळला जाईल असे वृत्त समोर आले होते मात्र शाह यांनी अफवा फेटाळून नवीन तारखा जाहीर केल्या आहेत. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयला (BCCI) मालिकेचे वेळापत्रक बदलण्याची विनंती केली होती, जी बीसीसीआयने मान्य केली. नव्या वेळापत्रकानुसार दुसरा एकदिवसीय 20 आणि मालिकेचा तिसरा एकदिवसीय सामना 23 जुलै रोजी खेळला जाणार आहे. (कोरोनामुळे India vs Sri Lanka सीरिजला ब्रेक; येत्या 13 जूलै पासून होणारे सामने स्थगित, जाणून घ्या नवे शेड्युल)

दुसरीकडे टी -20 मालिका 25 जुलैपासून सुरू होईल. दुसरा सामना 27 रोजी आणि शेवटचा सामना 29 जुलै रोजी होईल. सर्व सामने कोलंबोच्या आर. प्रेमदसा स्टेडियमवर खेळले जाणार आहेत. एकदिवसीय मालिका 13 जुलैपासून सुरू होणार होती आणि शेवटचा सामना 25 जुलै रोजी खेळला जाणार होता. परंतु कोरोनाच्या प्रकरणांमुळे आता पहिला एकदिवसीय सामना 18 जुलैला असेल तर शेवटचा सामना 29 जुलै रोजी आयोजित केला जाईल. कोरोना व्हायरसमुळे सर्व क्रिकेट बोर्डांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. तसेच यजमान बोर्डासाठी टीम इंडियाचा श्रीलंका दौरा खूप महत्वाचा आहे. भारतीय संघाचे वरिष्ठ खेळाडू सध्या इंग्लंड दौर्‍यावर आहेत त्यामुळे अनुभवी फलंदाज शिखर धवनच्या नेतृत्वात ज्येष्ठ व युवा खेळाडूंचा संघ श्रीलंका दौऱ्यावर पाठवण्यात आला आहे. शिवाय, माजी दिग्गज फलंदाज राहुल द्रविडकडे संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

पाहा भारत-श्रीलंका पूर्ण वेळापत्रक

18 जुलै - पहिला वनडे

20 जुलै - दुसरा वनडे

23 जुलै - तिसरा वनडे

25 जुलै - पहिला टी-20 आंतरराष्ट्रीय

27 जुलै - दुसरा टी-20 आंतरराष्ट्रीय

29 जुलै - तिसरा टी 20 आंतरराष्ट्रीय