IND vs SL: भारताविरुद्ध श्रीलंकन गोलंदाजाने केला कहर, टीम इंडियाला धूळ चरणाऱ्या ‘या’  फिरकीपटूवर असेल IPL फ्रँचायझींची नजर
भारत विरुद्ध श्रीलंका (Photo Credit: PTI)

श्रीलंकन (Sri Lanka) फिरकीपटू वनिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga) याने भारताविरुद्ध  (India) मर्यादित षटकांच्या मालिकेत एक जबरदस्त छाप सोडली आहे. लेगस्पिनर हसरंगाने वाढदिवशी सर्वोत्तम कामगिरी करत टी-20 मालिकेच्या अंतिम आणि निर्णायक सामन्यात भारतीय फलंदाजांचे कंबरडं मोडलं. यापूर्वी श्रीलंका संघाने इंग्लंडविरुद्ध मालिका खेळली तेव्हा हसरंगाने फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. आता असे वृत्त समोर येत आहे की इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) अनेक फ्रँचायझी त्याला संघात सामील करू शकतात. भारताविरुद्ध मालिकेत लोक त्याच्या लढाऊ वृत्तीचे कौतुक करत आहेत. त्याने दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये तीन विकेट्स घेतल्या आणि टी-20 मालिकेच्या शेवटच्या सामन्यात कहरच केला. हसरंगाच्या फिरकीपुढे भारतीय फलंदाज निरुत्तर दिसले. निर्णायक टी-20 सामन्यात हसरंगाने नऊ धावा देऊन चार विकेट्स काढल्या. (IND vs SL 2021: श्रीलंकेविरुद्ध भारताचा टॉप-ऑर्डर स्वस्तात ढेर, संघाच्या नावावर टी-20 च्या लज्जास्पद विक्रमाची नोंद)

हसरंगानेही त्याच्या दमदार कामगिरीने नक्कीच आयपीएल संघांचे लक्ष वेधून घेतले असेल. आणि आगामी काळात हसरंगावर सर्व फ्रँचायझींची नजर असेल आणि लवकरच त्याला जगातील प्रसिद्ध टी-20 लीग, आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळू शकते असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. यजमान श्रीलंकेच्या मालिकेतील उत्कृष्ट कामगिरीचे श्रेय हसरंगाला मिळू शकेल. आयपीएलच्या काही फ्रँचायझी वनिंदू हसरंगाला त्यांच्या संघात समाविष्ट करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे वृत्त आहे. आयपीएल 2021 चा दुसरा टप्पा 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. अशास्थितीत हसरंगावर पैशाचा पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे. इंग्लंडसह बरेच परदेशी खेळाडू आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातून बाहेर पडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे संघांची जागा रिक्त जागा भरून काढण्यासाठी हसरंगा एक उपयुक्त पर्याय ठरू शकतो. तिसऱ्या टी-20 सामन्यात हसरंगाने जबरदस्त गोलंदाजी केली आणि संजू सॅमसन व रितुराज गायकवाड यांना स्वस्तात पॅव्हिलियनमध्ये पाठवत भारतीय संघावर दबाव आणला.

दरम्यान, त्याच्या वाढदिवसानिमित्त हसरंगाला संस्मरणीय भेट मिळाली. हसरंगाला टी-20 मालिकेत आणि तिसऱ्या टी-20 मध्ये शानदार गोलंदाजीसाठी मॅन ऑफ द मॅच व मॅन ऑफ द सीरिजचा पुरस्कार देण्यात आला.