IND vs SL 1st Test Day 1: भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यात आजपासून मोहालीच्या IS बिंद्रा क्रिकेट स्टेडियमवर पहिल्या कसोटी सामन्याला सुरूवात झाली आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा यजमान भारतीय संघाने (Indian Team) 6 विकेट गमावून 357 धावा केल्या आहेत. फलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करून पहिल्या दिवसावर भारताला वर्चस्व मिळवून दिले. भारताकडून ऋषभ पंतने (Rishabh Pant) सर्वाधिक 96 धावा केल्या. तर हनुमा विहारीने 58 आणि विराट कोहलीने 45 धावांचे योगदान दिले. तसेच दिवसाचा खेळ संपला तेव्हा रवींद्र जडेजा 45 धावा आणि आर अश्विन 10 धावा करून खेळत होते. दुसरीकडे, श्रीलंका संघाला विकेटसाठी चांगला संघर्ष करावा लागत आहे. लसिथ एम्बुल्डेनियाने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. सुरंगा लकमल, विश्वा फर्नांडो, लाहिरू कुमारा आणि धनंजया डी सिल्वा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. (IND vs SL 1st Test Day 1: भारत विरुद्ध श्रीलंका पहिली कसोटी बनली Milestone मॅच, मोहाली टेस्टच्या पहिल्या दिवशी बनलेल्या प्रमुख विक्रमांवर एक नजर टाका)
मोहाली कसोटी सामन्याबद्दल बोलायचे तर भारतीय कसोटी संघाचा नवा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला उतरण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्मा आणि मयंक अग्रवाल यांनी भारताला झटपट सुरुवात करून दिली पण त्यांना आपापल्या डावाचे मोठ्या खेळीत रूपांतर करता आले नाही. रोहित 29 आणि मयंक 33 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. तर 100 वा कसोटी सामना खेळणारा विराट कोहली 45 धावा करून बाद झाला. विराट पाठोपाठ विहारी 58 धावा करून झटपट माघारी परतला. श्रेयस अय्यर 27 धावा करून बाद झाला. यानंतर पंतने अष्टपैलू जडेजाच्या साथीने मिळवून भारताचा डाव आणखी मजबूत केला. दोंघांनी शतकी भागीदारी करून संघाची धावसंख्या तीनशे पार पोहचवली. आक्रमक फलंदाजी करणारा पंतचे शतक चार धावांनी हुकले. सुरंगा लकमलने पंतची दांडी उडवली आणि 96 धावांत पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. पंतने आपल्या खेळीत नऊ चौकार आणि चार षटकार खेचले.
पहिल्या कसोटीसाठी भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये चेतेश्वर पुजाराच्या जागी विहारीला तिसऱ्या क्रमांकावर तर रहाणेच्या जागी अय्यरला पाचव्या क्रमांकावर स्थान देण्यात आले. तसेच टीम इंडिया सामन्यात तीन फिरकीपटू आणि दोन वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरली आहे. मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह वेगवान गोलंदाजीची जबाबदारी सांभाळतील, तर जडेजा, अश्विन आणि जयंत यादव यांच्याकडे फिरकी आक्रमणाची जबाबदारी देण्यात आली आहे.