IND vs SL 1st Test 2022: भारताच्या भेदक माऱ्यापुढे लंकन वाघ धराशाही, विराट कोहलीच्या 100 व्या कसोटीत टीम इंडियाचा श्रीलंकेवर एक डाव 222 धावांनी दणदणीत विजय
टीम इंडिया (Photo Credit: PTI)

IND vs SL 1st Test 2022: मोहालीच्या IS बिंद्रा क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या भारत (India) विरुद्ध श्रीलंका (Sri Lanka) पहिल्या कसोटी सामन्यात यजमान टीम इंडियाने (Team India) गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर एक डाव आणि 222 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. यासह दोन सामन्यांच्या मालिकेत रोहित शर्माच्या भारतीय संघाने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताच्या विजयात रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) यांनी बॅटनंतर बॉलने निर्णायक भूमिका बजावली. भारताने पहिले फलंदाजी करून दुसऱ्या दिवशी आपला पहिला डाव 574/8 धावांत घोषित केला. त्यांनतर आपल्या गोलंदाजांनी श्रीलंकेला पहिल्या डावात 174 धावांत गुंडाळले आणि भारताला 400 धावांची मोठी आघाडी मिळवून देत पाहुण्या संघाला फॉलोऑन खेळण्यास भाग पाडले. तथापि दुसरा डावात देखील लंकन फलंदाजांची पहिले पाठे पंचावन्न सिद्ध झाले. निरोशन डिकवेला याला वगळता एकही खेळाडू भारतीय गोलंदाजीपुढे दुसऱ्या डावात टिकू शकला नाही. (R Ashwin Scripts World Record: अश्विनचा ऐतिहासिक पराक्रम, कपिल देवचा सर्वात मोठा विक्रम मोडीत बनला भारताचा दुसरा महान कसोटी गोलंदाज)

या सामन्याच्या पहिल्या डावात भारताने 8 बाद 574 धावा केल्या होत्या, तर प्रत्युत्तरात श्रीलंकेचा पहिला डाव केवळ 174 धावांवर आटोपला. भारताने श्रीलंकेला फॉलोऑन खेळण्यास भाग पाडले. अश्विनने चरिथ अस्लंकाला दुसऱ्या डावात बाद करताच कपिल देव यांचा विक्रम मोडीत काढला. आता अश्विनच्या नावावर कसोटीत एकूण 435 विकेट्स आहेत. तर कपिल देव यांनी कसोटीत एकूण 434 विकेट्स घेतल्या आहेत. श्रीलंकेसाठी दुसऱ्या डावात निरोशन डिकवेला याने सर्वाधिक 51 धावांची खेळी केली. याशिवाय धनंजया डी सिल्वाने 30, अँजेलो मॅथ्यूज 28 आणि कर्णधार दिमुथ करुणारत्ने याने 27 धावांचे छोटेखानी योगदान दिले. परंतु लंकेचे वाघ भारतीय गोलंदाजांपुढे 178 धावांत ढेर झाले. श्रीलंकेच्या दुसऱ्या डावात अश्विन आणि जडेजा यांनी प्रत्येकी चार विकेट घेतल्या. तर मोहम्मद शमीने दोन गडी बाद केले.

दरम्यान भारतीय संघाचा हा विजय दोन कारणांमुळे खास ठरला. रोहित शर्माचा कसोटी कर्णधार म्हणून हा पहिला विजय आहे, तर मोहाली कसोटी सामना माजी कर्णधार विराट कोहलीच्या कारकिर्दीतील 100 वा टेस्ट सामना ठरला. त्यामुळे या प्रतिष्ठित सामन्यात भारतीय संघाने मोठ्या विजयासह आणखी खास बनवला. आता दोन्ही संघात 12 मार्चपासून बेंगलोर येथे दुसरा सामना खेळला जाईल, जो की गुलाबी चेंडूने दिवस/रात्र खेळला जाणार आहे.