पृथ्वी शॉ (Photo Credits: PTI)

IND vs SL 1st T20I: कोलंबोच्या (Colombo) आर. प्रेमदासा स्टेडियमवर श्रीलंकाविरुद्ध (Sri Lanka) सुरु असलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात यजमान संघाने टॉस जिंकून टीम इंडियाला (Team India) पहिले फलंदाजी करण्यास बोलावले. दोन्ही संघात आजच्या सामन्यासाठी काही बदल झाले असून भारतीय संघाने (Indian Tem) सलामी फलंदाज पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) व फिरकीपटू वरुण चक्रवर्ती यांना पदार्पणाची संधी दिली आहे. या आठवड्याच्या सुरूवातीस श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेत शानदार पदार्पणानंतर पृथ्वीला टी-20 आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळाली पण तो वनडे क्रिकेटमधील खेळीची पुनरावृत्ती करण्यात अपयशी ठरला. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दुश्मंथा चमीराने लंकेसाठी सलामीचे षटक टाकले. चमीराने ऑफस्टिकच्या बाहेर टाकलेला चेंडू पृथ्वीच्या बॅटची कड घेऊन यष्टीरक्षक मिनोद भानुकाच्या हातात विसावला. पृथ्वी सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला आणि त्याचे टी-20 पदार्पण वाईट स्वप्नासारखे ठरले. (IND vs SL 2021: श्रीलंकेसोबत आज पहिला T20 सामना, टीम इंडिया कर्णधार शिखर धवनच्या खांद्यावर असणार ‘ही’ मोठी जबाबदारी)

आपल्या या फ्लॉप खेळीसह पृथ्वी टी-20 पदार्पणात शून्यावर बाद होणारा भारताचा तिसरा फलंदाज ठरला आहे. यादीत पृथ्वी समवेत माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) व तुफानी सलामी फलंदाज केएल राहुल (KL Rahul) यांचा समावेश आहे. राहुल 2016 मध्ये झिम्बाब्वे विरोधात टी-20 पदार्पण सामन्यात भोपळा न फोडता माघारी परतला होता. तर यापूर्वी एमएस धोनीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी-20 वर्ल्ड कप सामन्यातून पदार्पण केले होते, पण माजी वर्ल्ड कप विजेता कर्णधारही आपल्या डेब्यू सामन्यात एकही धाव करू शकला नाही. दरम्यान, श्रीलंका दौऱ्यावर वनडे मालिकेत पृथ्वीच्या कामगिरी बद्दल बोलायचे तर त्याने मालिकेत अनुक्रमे 43, 13 आणि 49 असे रन करून एकूण 105 धावा काढल्या. या दरम्यान त्याने मालिकेत कोणत्याही फलंदाजाने मारलेले एकूण 20 चौकार खेचले.

दरम्यान, पृथ्वी टी-20 मध्ये भारताचा सर्वात तरुण सलामी फलंदाज ठरला. त्याने वयाच्या 21वर्ष 258 दिवशी डेब्यू केले. शॉने या दरम्यान रोहित शर्माला मागे सोडले. रोहित वयाच्या 22 वर्ष आणि 37 दिवसाचा असताना टी -20 मध्ये भारतासाठी सलामीला उतरला होता. इतकंच नाही तर पृथ्वी शॉ वयाच्या 24 व्या वर्षापूर्वी कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 मध्ये पदार्पण करणारा पहिला भारतीय फलंदाज बनला आहे. दुसरीकडे, आजच्या सामन्यात श्रीलंकेने टॉस जिंकला व भारताला पहिले फलंदाजी करण्यास बोलावले. आजच्या मॅचसाठी संघाने संजू सॅमसन व ईशान किशन या दोघांचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला आहे.