IND vs SCO 2021: केएल राहुलची बॅट तळपली, विश्वचषकात वेगवान अर्धशतक करणारा बनला दुसरा भारतीय; बुमराह T20 मध्ये भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज
केएल राहुल आणि जसप्रीत बुमराह (Photo Credit: PTI)

आयसीसी टी-20 विश्वचषक (ICC T20 World Cup) 2021 च्या 37 व्या साखळी सामन्यात स्कॉटलंडने (Scotland) भारताला (India) विजयासाठी 86 धावांचे लक्ष्य दिले होते. हे लक्ष्य गाठणे भारताला फारसे अवघड झाले नाही 6.3 षटकात दोन विकेट गमावून लक्ष्य गाठले. यासह त्यांचा नेट रन-रेट न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानच्या तुलनेत अधिक पटीने सुधारला आहे. भारताच्या या विजयात केएल राहुल (KL Rahul) आणि रोहित शर्माच्या खेळीने मोलाचे योगदान दिले. रोहित 30 धावांवर बाद झाला असला तरी राहुलने एक खेळी खेळली जी अनेक अर्थांनी संस्मरणीय ठरली. राहुलने या सामन्यात आपले अर्धशतक 18 चेंडूत पूर्ण केले. 19 चेंडूत 50 धावांवर तो बाद झाला असला तरी त्याच्या खेळीदरम्यान त्याने 3 षटकार आणि 6 चौकार मारले. त्याचा स्ट्राइक रेट 263.16 होता. याच सोबत तो भारतासाठी T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक करणारा दुसरा वेगवान फलंदाज बनला आणि गौतम गंभीरचा विक्रम मोडला. (T20 World Cup 2021: स्कॉटलंडविरुद्ध KL Rahul साठी टाळ्या वाजवताना Athiya Shetty झाली स्पॉट, पहा Photo)

यापूर्वी माजी सलामीवीर  गंभीरने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले होते आणि तो दुसऱ्या क्रमांकावर होता. मात्र आता राहुल 18 चेंडूत हा पराक्रम करून दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय मध्ये भारताचा सर्वात वेगवान अर्धशतक करण्याचा विक्रम युवराज सिंहच्या (Yuvraj Singh) नावावर आहे, ज्याने 2007 टी-20 विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध डर्बन येथे 12 चेंडूत हा पराक्रम केला होता. तसेच राहुलने T20 विश्वचषकात आतापर्यंतचे तिसरे जलद अर्धशतक झळकावले आणि मॅक्सवेलची बरोबरी केली. आता राहुल आणि मॅक्सवेल टी-20 विश्वचषकात सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याच्या बाबतीत संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर बसले आहेत. दोघांनी प्रत्येकी 18 चेंडूत ही अप्रतिम खेळी केली आहे.

याशिवाय, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) स्कॉटलंडविरुद्ध टी-20 विश्वचषकात दोन विकेट घेतल्या आणि या फॉरमॅटमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. बुमराहच्या नावावर आता क्रिकेटच्या झटपट फॉरमॅटमध्ये 64 विकेट्स आहेत. त्याने 18 व्या षटकात मार्क वॅटला बाद करून कामगिरीची नोंद केली. यापूर्वी भारताकडून सर्वाधिक टी-20 विकेट घेण्याचा विक्रम युजवेंद्र चहलच्या नावावर होता, ज्याने 49 सामन्यांत 63 विकेट घेतल्या आहेत. ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनच्या नावावर 48 सामन्यांत 55 विकेट, तर भुवनेश्वर कुमारच्या नावावर 52 सामन्यांत 50 आणि रवींद्र जडेजाच्या नावावर 54 सामन्यांत 43 विकेट्स आहेत.