या वर्षी ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या आयसीसी टी-20 विश्वचषक (ICC T20 World Cup) 2022 स्पर्धेची तिकीट विक्री सुरू झाली आहे. भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) संघ कोणत्याही मंचावर भिडतात तेव्हा चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचतो आणि यावेळी तिकीट खरेदीतही तेच दिसून आले. टी-20 वर्ल्ड कप 2022 मध्ये भारत आणि पाकिस्तान संघ 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न (Melbourne) येथे आमनेसामने येणार असून या तिकिटे काही मिनिटांतच विकली गेली आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कोणताही सामना पाहण्याची एकही संधी चाहते सोडत नाहीत. आयसीसीने (ICC) या सामन्याच्या तिकिटांची विक्री सुरू केली आणि अवघ्या तासाभरात सर्व तिकिटे विकली गेली. आयसीसी विश्वचषक स्पर्धेसाठी आतापर्यंत 2 लाख तिकिटे विकली गेली आहेत, त्यापैकी 60,000 तिकिटे फक्त भारत आणि पाकिस्तान सामन्याची आहेत, जी हाऊसफुल्ल झाली आहे. (T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलियात होणारा टी20 विश्वचषकातील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी तिकीट बुकिंग सुरू, 'अशी' खरेदी करता येतील)
भारत-पाकिस्तान सामन्याशिवाय विश्वचषक अंतिम फेरीची तिकिटे आणि इंग्लंड-न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया गटातील सामन्यांचीही बहुतांशी तिकिटांची विक्री झाली आहे. ती-20 विश्वचषकच्या इतिहासात भारत-पाकिस्तान संघ 23 ऑक्टोबर रोजी 7व्यांदा आमनेसामने येणार आहेत. दोघांमधील शेवटच्या 6 पैकी 5 सामने तटस्थ ठिकाणी खेळले गेले आहेत, ज्यामध्ये भारताने 3 सामने जिंकले आहेत. दरम्यान यावर्षी होणाऱ्या स्पर्धेत पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि दोन क्वालिफायर्ससह भारताला सुपर 12 मध्ये गट-2 मध्ये स्थान देण्यात आले आहे. संपूर्ण स्पर्धेत भारत एकूण 5 सामने खेळणार आहे. पहिला सामना 23 ऑक्टोबरला पाकिस्तानशी, दुसरा सामना 27 ऑक्टोबरला अ गटातील उपविजेत्यासोबत, तिसरा सामना 30 ऑक्टोबरला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध, चौथा सामना 2 नोव्हेंबरला बांगलादेशविरुद्ध आणि पाचवा सामना 6 नोव्हेंबर रोजी ब गटातील विजेत्याशी होईल.
This is going to be something! 🤯https://t.co/495YJE4zHV
— cricket.com.au (@cricketcomau) February 8, 2022
गेल्या वर्षी UAE मध्ये झालेल्या T20 विश्वचषक स्पर्धेत भारताने आपल्या मोहिमेची सुरुवात पाकिस्तानविरुद्ध केली होती. या सामन्यात टीम इंडियाला पाकिस्तानकडून 10 गडी राखून पराभव पत्करावा लागला होता. आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारताला पाकिस्तानविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागण्याची ही पहिलीच वेळ होती. दुसरीकडे, 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर दरम्यान खेळल्या जाणाऱ्या स्पर्धेचा चाहत्यांना स्टेडियममध्ये जाऊन सामन्याचा आनंद लुटता यावा या उद्देशाने तिकिटे t20worldcup.com वर उपलब्ध आहेत. यामध्ये फायनलसह 45 सामन्यांची तिकिटे खरेदी करता येणार आहेत. “पहिल्या फेरीसाठी आणि सुपर 12 टप्प्यासाठी मुलांची तिकिटे $5 आहेत, तर प्रौढांची तिकिटे $20 आहेत,” ICC ने निवेदनात म्हटले आहे.