
आशिया कप 2023 (Asia Cup 2023) मध्ये दोन सामने झाले आहेत. पहिल्या सामन्यात पाकिस्तानने नेपाळचा 238 धावांनी पराभव केला होता. तर दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने बांगलादेशचा 5 गडी राखून पराभव केला. आता तमाम क्रिकेट चाहत्यांच्या नजरा भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामन्याकडे लागल्या आहेत. पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, (Pallekele International Cricket Stadium) कॅंडी येथे हा सामना खेळवला जाईल. (हे देखील वाचा: IND vs PAK Asia Cup 2023: भारत-पाकिस्तान सामन्यावर पावसाचे संकट, इतक्या षटकांचा होवु शकतो सामना; जाणून घ्या केव्हा लागू होणार डकवर्थ लुईस नियम)
जाणून घ्या कशी असेल खेळपट्टी?
पल्लेकेलेची खेळपट्टी सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना बाऊन्स आणि स्विंग देऊ शकते. त्यानंतर खेळपट्टी फलंदाजीला साथ देते. दुसऱ्या डावात खेळपट्टीवर फलंदाजी करणे सोपे होते. अशा स्थितीत नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा होऊ शकतो. खेळपट्टी कोरडी असेल तर फिरकीपटू चमत्कार करू शकतात. दोन्ही संघांकडे चांगले फिरकीपटू आहेत, जे संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. अशा परिस्थितीत, नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
पल्लेकेले क्रिकेट स्टेडियमवर आतापर्यंत 37 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 15 जिंकले आहेत आणि लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने 21 सामने जिंकले आहेत. येथे पहिल्या डावाची सरासरी स्कोअर 248 आणि दुसऱ्या डावाची सरासरी 201 आहे.
पल्लेकेले येथे श्रीलंकेच्या संघाने 1996 मध्ये केनियाविरुद्ध सर्वाधिक धावा केल्या होत्या, तेव्हा श्रीलंकेने 398 धावा केल्या होत्या. झिम्बाब्वेने येथे सर्वात कमी 70 धावा केल्या आहेत. या मैदानावर लसिथ मलिंगाने सर्वाधिक 24 विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर तिलकरत्ने दिलशानने 15 डावात सर्वाधिक 939 धावा केल्या आहेत.
भारताने आतापर्यंत श्रीलंकेविरुद्ध पल्लेकेले येथे तीन सामने खेळले आहेत, त्यापैकी तीन वेळा टीम इंडियाने विजय मिळवला आहे. टीम इंडियाचा येथे सर्वोत्तम स्कोअर 294 धावा आहे, जो 2012 मध्ये बनला होता.