IND vs NZ WTC Final 2021 Day 3: काईल जेमीसनच्या ‘पंच’ने टीम इंडिया बॅकफूटवर, पहिल्या डावात ‘विराटसेने’ची 217 धावांपर्यंत मजल
काईल जेमीसन (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs NZ WTC Final 2021 Day 3: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) फायनल सामन्यात भारतीय संघाचा (Indian Team) पहिला डाव संपुष्टात आला आहे. टॉस गमावून पहिले फलंदाजीला आलेली टीम इंडियाने (Team India) पहिल्या डावात 92.1 ओव्हरमध्ये 217 धावांपर्यंत मजल मारली. भारताकडून उपकर्णधार अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) सर्वाधिक 49 धावा केल्या तर किवी संघासाठी काईल जेमीसन (Kyle Jamieson) 5 विकेट्स घेतल्या आणि ‘विराटसेने’ला सामन्यात बॅकफूटवर ढकलले. भारतासाठी कर्णधार विराट कोहलीने 44 आणि रोहित शर्माने 34 धावांचे छोटेखानी योगदान दिले. तसेच रवींद्र जडेजाने 15 धावा केल्या. जेमीसनला नील वॅग्नर आणि अन्य गोलंदाजांची चांगली साथ मिळाली आणि त्यांनी भारतीय फलंदाजांना धावा करण्यासाठी संघर्ष करायला लावला. वॅग्नर आणि ट्रेंट बोल्ट यांना प्रत्येकी 2 तर टिम साउदीला 1 विकेट मिळाली. (IND vs NZ WTC Final 2021: विराट कोहलीने ज्या बॉलरवर लावला 15 कोटींचा डाव त्याने निर्णायक सामन्यात अडकवले जाळ्यात, यूजर्सने पाडला Memes चा पाऊस)

पहिल्या दिवसाच्या खेळावर पावसाने पाणी फिरल्यावर दुसरी दिवसापासून सामन्याला सुरुवात झाली. किवी कर्णधार केन विल्यमसनने टॉस जिंकून भारताला पहिले फलंदाजीला बोलावले. सर्वांना चकित करत न्यूझीलंडने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये फिरकी गोलंदाजाला वगळले आणि पाच वेगवान गोलंदाजांचा समावेश केला. भारतासाठी रोहित शर्मा व शुभमन गिलने चांगली सुरुवात केली. दोंघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारी झाली. त्यानंतर दोघे काही बॉलच्या अंतराने पॅव्हिलियनमध्ये परतले. चेतेश्वर पुजारा देखील काही कमाल करू शकला नाही. त्यानंतर कोहली आणि रहाणेने चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण जेमीसनने ही घातक ठरणारी जोडी मोडली आणि किवी संघाला मोठे यश मिळवून दिले.

त्यानंतर सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांची घसरण कायम राहिली आणि किवी गोलंदाजांनी आक्रमक पवित्रा घेत पहिल्या सत्रावर वर्चस्व गाजवले. रिषभ पंत देखील पहिल्या डावात संघाच्या कामी येऊ शकला नाही. पंतने 4 धावा केल्या. भारताकडून एकही फलंदाज अर्धशतकी धावसंख्या पार करू शकला नाही. सामन्याची संपूर्ण मदार जाडेजावर असताना बुमराह आणि इशांत हे जेमिसनच्या ओव्हरमध्ये लागोपाठ बाद झाले. ज्यानंतर 92 व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर जाडेजाही बाद झाला आणि भारताचा डाव 217 धावांवर आटोपला.