IND vs NZ: शतकवीर श्रेयस अय्यरने वाढवले कर्णधाराचे टेंशन, विराट कोहली परतल्यास प्लेइंग इलेव्हनमधून कोण होणार आऊट
श्रेयस अय्यर आणि रवींद्र जडेजा (Photo Credit: PTI)

कानपुरच्या (Kanpur) ग्रीन पार्क स्टेडियमवर न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने (Team India) दिवसाच्या पहिल्या दिवशी वर्चस्व गाजवले. यजमान टीम इंडियाने पहिल्या दिवशी 4 विकेट गमावत 258 धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण करणाऱ्या श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) सर्वोत्तम कामगिरी केली. त्याने 171 चेंडूत 105 धावांची शानदार खेळी खेळली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा तो अर्धशतक करून तळ ठोकून खेळत होता. तर दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला त्याने आपली लय कायम ठेवनू पदार्पणात शतक करण्याचा मोठा कारनामा केला. अय्यरच्या या खेळाने भारतीय संघाला (Indian Team) पहिल्या डावात आघाडी मिळवून दिली. भारताचा पहिला डाव दुसऱ्या दिवशी 345 धावांवर आटोपला. दुसरीकडे, श्रेयसची ही खेळी भारतीय कर्णधाराची चिंता वाढवणारी आहे. (IND vs NZ 1st Test Day 2: कानपुरमध्ये Tim Southee कडून भारतीय संघाचा ‘पंच’नामा, यजमानांचा पहिला डाव 345 धावांवर आटोपला)

न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात नियमित कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) विश्रांती दिली आहे. मात्र विराट दुसऱ्या कसोटी सामन्यात संघात सामील होणार असून त्याने मुंबईत सरावाला सुरुवातही केली आहे. साहजिकच कर्णधार असल्याने त्याचा प्लेइंग इलेव्हनमध्येही समावेश होणे निश्चित आहे. असे झाल्यास भारताच्या सध्याच्या संघातून एका फलंदाजाला बाहेर पडावे लागेल. हीच गोष्ट भारतीय व्यवस्थापनासाठी मोठी चिंतेची बाब ठरणार आहे की, बाहेर जाणारा फलंदाज कोण असेल. अय्यर मधल्या फळीतील फलंदाज आहे. त्यामुळे सलामीच्या जोडीमध्ये कोणताही बदल होणार नाही हे निश्चित आहे. म्हणजेच कोहलीच्या पुनरागमनानंतर संघाच्या मधल्या फळीत बदल शक्य आहे. कानपूर कसोटीबद्दल बोलायचे झाले तर चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर आणि अजिंक्य रहाणे यांनी मधल्या फळीत अनुक्रमे 3, 4 आणि 5 व्या क्रमांकावर फलंदाजी केली. आणि कोहली चौथ्या क्रमांकावर खेळतो.

न्यूझीलंडविरुद्ध दुसरा कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात विराट कोहली पुन्हा एकदा संघाची धुरा आपली हाती घेणार असल्यामुळे श्रेयस अय्यरला संघात ठेवण्यासाठी पुजारा किंवा रहाणेच्या जागेशी छेडछाड केली जाईल का? असा प्रश्न उभा राहिला आहे. तथापि श्रेयस अय्यरच्या फक्त एका सामन्यातील कामगिरीच्या आधारे पुजारा किंवा रहाणेच्या जागेवर छेडछाड करता येणार नाही. त्यामुळे कानपुरमध्ये श्रेयस पाहिजे तितक्या धावा करू शकतो, पण संघातील सर्व खेळाडू तंदुरुस्त राहिल्यास ते प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर जाण्याची शक्यता कमीच आहे.