रोहित शर्मा आणि ईशान किशन (Photo Credit: PTI)

IND vs NZ 3rd T20I 2021: कोलकाता (Kolkata) येथील ईडन गार्डन्सवर रोहित शर्माच्या  (Rohit Sharma) टीम इंडियाने (Team India) टिम साउदीच्या न्यूझीलंडवर (New Zealand) 73 धावांनी विजय मिळवला आणि किवी संघाचा क्लीन-स्वीप करून टी-20 मालिका 3-0 अशी मालिका काबीज केली. पहिल्या दोन सामन्यात धडाकेबाज विजयानंतर ‘सिटी ऑफ जॉय’मध्ये भारतीय संघाने (Indian Team) पुन्हा एकदा एकतर्फी विजय मिळवला आणि किवी संघाला धोबीपछाड दिला. भारताच्या कोलकात्यात सामन्यासह मालिका विजयात कर्णधार रोहित, फिरकीपटू अक्षर पटेल (Axar Patel) यांनी निर्णायक भूमिका बजावली. तर ब्लॅककॅप्ससाठी सलामीवीर मार्टिन गप्टिल (Martin Guptill) एकटा लढला आणि 36 चेंडूत 51 धावांची संयमी अर्धशतकी खेळी केली, जी संघाच्या पराभवासह व्यर्थ ठरली. टीम इंडियासाठी आजच्या सामन्यात अक्षर पटेलने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तर हर्षल पटेलने 2, दीपक चाहर-युजवेंद्र चहल आणि व्यंकटेश अय्यरने प्रत्येकी एक गडी बाद केला. (IND vs NZ 3rd T20I 2021: कोलकात्यात ‘हिटमॅन’ रोहितची जबराट बॅटिंग, टी-20 कारकिर्दीतील ठोकले 26 वे अर्धशतक; विराट कोहलीला पछाडले)

रोहित शर्माच्या 56 धावा आणि दीपक चाहरने अखेरच्या षटकात चांगली फटकेबाजी करुन भारताला 184 धावांपर्यत मजल मारुन दिली. प्रत्युत्तरात धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या किवी संघाचं अक्षर पटेलने अक्षरशः कंबरडं मोडलं. दोन षटकात 21 धावा फटकावल्यानंतर गोलंदाजीला आलेल्या अक्षरने आपल्या पहिल्याच षटकात दोन यश मिळवून दिले. भारताला तिसऱ्या षटकात पहिलं यश मिळवून देत पटेलने सलामीवीर डॅरिल मिशेलला 5 धावांवर असताना हर्षल पटेलकडे झेलबाद केलं. त्यानंतर अंतिम चेंडूवर मार्क चॅपमनला शून्यावर माघारी धाडलं. त्यानंतर फिरकीपटूच्या गोलंदाजीवर चकमा खात ग्लेन फिलिप्स भोपळा न फोडता बाद झाला. गप्टिलकडून संघाला मोठ्या अपेक्षा होत्या पण अर्धशतक करून तो मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. जेम्स नीशम आणि प्रभारी कर्णधार मिचेल सँटनर देखील मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. अशाप्रकारे भारताने दिलेल्या 185 लक्ष्याच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंड 111 धावांवर गारद झाला.

उल्लेखनीय आहे की यापूर्वी आजच्या सामन्यात टॉस जिंकून भारताने फलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय रोहित आणि ईशान किशनने योग्य ठरवला. दोघांनी 69 धावांची सलामी भागीदारी केली. मधल्या षटकांमध्ये भारताची फलंदाजी ढेपाळली, मात्र हर्षल आणि दीपक चाहरने अखेरच्या षटकात चांगली फटकेबाजी करुन संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत मजल मारुन दिली. चाहरने नाबाद 21 धावा ठोकल्या. दुसरीकडे, न्यूझीलंडकडून मिचेल सँटनरने उत्कृष्ट गोलंदाजी केली आणि 3 विकेट घेतल्या. तसेच अ‍ॅडम मिल्ने, ईश सोढी आणि लॉकी फर्ग्युसनने प्रत्येकी एक विकेट घेतली.