IND vs NZ 2nd Test: शुभमन गिलने खेचला शानदार चौकार... मग वानखेडे स्टेडियमवर झाला ‘सचिन...सचिन’ चा जयघोष (Watch Video)
शुभमन गिल (Photo Credit: PTI)

IND vs NZ 2nd Test: ‘क्रिकेटचा देव’ मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊन बरीच वर्ष उलटली आहे. पण आजही क्रिकेट प्रेमींच्या मनात मास्टर-ब्लास्टरचेच राज्य आहे. भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात सुरू असलेल्या मुंबई कसोटीच्या (Mumbai Test) तिसऱ्या दिवशी याचे ताजे उदाहरण पाहायला मिळाले. विशेष म्हणजे ही घटना त्यावेळी घडली, जेव्हा किवी वेगवान गोलंदाज टिम साउदीच्या एका चेंडूवर भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिलने (Shubman Gill) धडाकेबाज चौकार ठोकले. विराट कोहलीही मैदानात होता. भारतीय संघाच्या (Indian Team) दुसऱ्या डावातील 37 व्या षटकातील पहिल्या चेंडूवर गिलने जोरदार चौकार खेचला. चेंडू बुलेटच्या वेगाने 4 धावांसाठी सीमारेषे पार गेला. (IND vs NZ 2nd Test Day 3: तिसऱ्या दिवशी लंच-ब्रेकपर्यंत टीम इंडियाचा स्कोर 2 बाद 142 धावा, न्यूझीलंडवर घेतली 405 धावांची आघाडी)

काही वेळातच वानखेडे स्टेडियमवर प्रेक्षकांनी ‘सचिन...सचिन’ असा जयघोष केला. मास्टर ब्लास्टरने 2013 मध्ये वानखेडे स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटची कसोटी खेळली होती. सामन्याबद्दल बोलायचे झाले तर विवारी लंच ब्रेकपर्यंत भारताने दुसऱ्या डावात 2 बाद 142 धावा केल्या. अशा प्रकारे भारताची एकूण आघाडी आता 405 धावांवर पोहोचली आहे. पहिल्या डावात भारताच्या 325 धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा डाव 62 धावांवर आटोपला होता. मयंक अग्रवालने दुसऱ्या डावात आणखी एक अर्धशतक करून तिसऱ्या दिवशी भारताला सामन्यावर आणखी मजबूत ताबा मिळवून दिला. त्याने चेतेश्वर पुजारासह भारतासाठी 100 धावांची भागीदारी केली आणि चांगली फलंदाजी केली.

भारताने दिवसाच्या पहिल्या सत्रात मयंक अग्रवाल (62) आणि चेतेश्वर पुजारा (47) यांच्या विकेट्स गमावल्या. उल्लेखनीय आहे की दोन्ही सलामी फलंदाजांना इतर कोणी नाही तर एजाज पटेलने बाद केले, ज्याने सामन्यातील त्याच्या विकेटची संख्या 12 विकेट्सवर नेली. तो किवींसाठी सर्वात धोक्याचा गोलंदाज दिसत आहे. त्याने पहिल्या डावात 119 धावांत सर्व 10 विकेट घेतल्या होत्या. दरम्यान तिसऱ्या दिवशी भारतीय संघ मुंबई कसोटीत न्यूझीलंडवर मोठी आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असून आज संपूर्ण दिवस त्यांनी फलंदाजी करणे अपेक्षित आहे. दुसरीकडे, एजाज पटेलला वगळता अन्य किवी गोलंदाज विकेटसाठी आणि भारताच्या धावगतीवर वेसण घालण्यासाठी संघर्ष करत आहेत.