IND vs NZ 2nd Test: तिसऱ्या दिवसाखेर मुंबई कसोटीवर भारताचा ताबा, विराटसेनेला विजयासाठी 5 विकेटची गरज; Daryl Mitchell याचा अर्धशतकी लढा
टीम इंडिया (Photo Credit: PTI)

IND vs NZ 2nd Test Day 3: भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटो सामन्याच्या तिसऱ्या दिवसाखेर यजमान टीम इंडियाने (Team India) सामन्यावर ताबा मिळवला आहे. भारतीय संघाने आपला दुसरा डाव 276/7 धावांवर घोषित करून किवी संघापुढे 540 रन्सचे विशाल टार्गेट दिले आहे. प्रत्युत्तरात किवी टीमने दिवसाखेरीस 5 बाद 140 धावांवर मजल मारली आहे. चौथ्या दिवशी आता टीम इंडियाला विजयासाठी आणखी पाच विकेटची गरज असेल. दुसरीकडे, भारताकडून फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) तीन विकेट घेत न्यूझीलंडच्या आघाडीच्या तीनही फलंदाजांना स्वस्तात माघारी धाडलं आणि संघावर दडपण आणले. त्यानंतर अक्षर पटेलने डॅरिल मिशेलला (Daryl Mitchell) बाद करून संघाला मोठा दिलासा दिला. मिशेलने 92 चेंडूत 60 धावांची झुंजार अर्धशतकी खेळी केली. (Watch Video: मुंबई कसोटीत जेव्हा स्पायडर कॅम मुळे सामन्यात आला अडथळा, थांबला सामन्याचा रोमांच)

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी 69/0 च्या पुढे खेळताना भारताने 70 षटकात 7 गडी गमावून 276 धावांवर दुसरा डाव घोषित केला. मिशेल आणि निकोल्स यांनी संयमाने भारतीय गोलंदाजानाचा सामना करून दुसऱ्या डावात संघाची धावसंख्या शंभरी पार पोहचवली. पहिल्या डावाच्या जोरावर भारताकडे 263 धावांची आघाडी होती आणि आता दुसऱ्या डावात 276 धावा करून किवी संघासमोर 540 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात कर्णधार टॉम लाथमच्या रूपात किवींनी दुसऱ्या डावात 13 धावांवर पहिली विकेट गमावली. प्रभारी कर्णधार लाथम 6 धावांवर अश्विनच्या गोलंदाजीवर LBW बाद झाला. त्यानंतर अश्विनने आपल्या एकाच षटकात किवी संघाला दोन धक्के दिले. त्याने 20 धावांवर विल यंगला आणि रॉस टेलरला (6 धावा) बाद करून भारताला तिसरे यश मिळवून दिले. मिशेल आणि निकोल्समध्ये 73 धावांची भागीदारी अक्षर पटेलने मोडली. तर टॉम ब्लंडेल धावबाद झाला.

भारताने तिसऱ्या दिवसाच्या खेळाला दमदार सुरुवात केली. मयंक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजारा फलंदाजीत वरचढ ठरत होते. दरम्यान पहिल्या डावात 150 धावा करणाऱ्या मयंकने 90 चेंडूत आपले पाचवे अर्धशतक पूर्ण केले. या सामन्याबद्दल बोलायचे तर पावसाने प्रभावित सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. मयंकचे शतक आणि अक्षर पटेलच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने 325 धावांपर्यंत मजल मारली. तर एजाज पटेलने न्यूझीलंडकडून सर्व 10 विकेट घेतल्या. मात्र, भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडचा पहिला डाव अवघ्या 62 धावांवर गुंडाळला. आर अश्विनने 4, मोहम्मद सिराजने 3, अक्षर पटेलने 2 आणि जयंत यादवने 1 बळी घेतला. अशा प्रकारे भारताला पहिल्या डावाच्या आधारे 263 धावांची आघाडी मिळाली.