IND vs NZ 2nd T20I 2021: विराट कोहलीचा एलिट रेकॉर्ड मोडण्यापासून Martin Guptill फक्त काही पावले दूर, रांचीत किवी ओपनर ठरणार ‘रन-मशीन’च्या वरचढ?
मार्टिन गप्टिल आणि विराट कोहली (Photo Credit: PTI)

IND vs NZ 2nd T20I 2021: रांची (Ranchi) येथे आज (19 नोव्हेंबर) तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या टी-20 सामन्यात विराट कोहलीचा (Virat Kohli) आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधील एलिट विक्रम मोडला जाऊ शकतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर फटाफट क्रिकेटमध्ये 3217 धावांसह न्यूझीलंडचा (New Zealand) सलामीवीर मार्टिन गप्टिल (Martin Guptill) सध्या सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. कोहलीने आतापर्यंत 95 टी-20 सामन्यांमध्ये 3227 धावा आहेत आणि त्याच्याकडे सध्या वरिष्ठ किवी फलंदाजावर फक्त 10 धावांची आघाडी आहे. अशा परिस्थितीत रांचीच्या JSCA क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या आजच्या सामन्यात गप्टिलने 11 धावा केल्या तर तो कोहलीला मागे टाकून सर्वात लहान फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणारा नंबर- 1 फलंदाज बनेल. लक्षात घ्यायचे की कोहलीने सध्या सुरू असलेल्या मालिकेतून विश्रांती घेतली आहे. (Martin Guptill On R Ashwin: ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनविरुद्ध धावा करणे खूप कठीण आहे, 'या' खेळाडूने केले वक्तव्य)

दरम्यान, गप्टिलने आतापर्यंत टी-20 मध्ये 2 शतके आणि 19 अर्धशतके केली आहेत. तर कोहली अजून एकही शतका गवसणी घालू शकलेला नसून त्याने 29 अर्धशतकांची नोंद केली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात गप्टिल कोहलीचा रेकॉर्ड मोडतो की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून असणार आहे. याशिवाय नवनियुक्त टीम इंडियाचा टी-20 कर्णधार रोहित शर्मा 3086 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे. गप्टिल आणि कोहली या दोघांनाही मागे टाकून आघाडी घेण्यासाठी सलामी फलंदाजाला आपला शतकाचा दुष्काळ संपवावा लागेल. 4 टी-20 शतके झळकावणारा रोहित 2018 पासून या फॉरमॅटमध्ये तिहेरी आकडा पार करू शकलेला नाही. तसेच रोहित आणि गप्टिल या दोघांनीही यापूर्वी या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. हे दोन्ही फलंदाजांनी 2018 मध्ये वेगवेगळ्या महिन्यांमध्ये अव्वल स्थान गाठले होते. तसेच 2019 मध्येही कोहलीने अव्वल स्थान काबीज केले होते. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाचा व्हाईट बॉल कर्णधार आरोन फिंच (2608 धावा) आणि आयर्लंडचा पॉल स्टर्लिंग (2570 धावा) अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत.

भारत-न्यूझीलंड मालिकेबद्दल बोलायचे तर रोहितची ‘हिटमॅन’ आर्मी 1-0 ने आघाडीवर आहे आणि रांचीमधील विजयामुळे ते ब्लॅककॅप्स विरोधात आणखी एक मालिका खिशात घालू शकतात. द्विपक्षीय मालिकेत न्यूझीलंडविरुद्ध भारताचे वर्चस्व राहिले आहे आणि मागील 3 पैकी 2 मालिकांमध्ये किवी संघाला लोळवलं आहे. आजच्या या महत्त्वाच्या सामन्यासाठी दोन्ही संघ आपापल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्याची शक्यता कमीच आहे.