IND vs NZ 1st T20I: कॉलिन मुनरो, केन विल्यमसन यांची धडाकेबाज बॅटिंग; न्यूझीलंडचे टीम इंडियाला 204 धावांचे लक्ष्य 
केन विल्यमसन (Photo Credit: Twitter/ICC)

ऑकलंडच्या ईडन पार्क येथे भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेचा पहिला सामना खेळला जात आहे. मालिकेच्या पहिल्या सामन्यात टॉस गमावून पहिले फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 5 बाद 203 धावा केल्या आणि भारतासमोर धावांचे 204 लक्ष्य दिले. छोटी बाउंड्री असल्याने या सामन्यात मोठे षटकार आणि चौकार पाहायला मिळाले. किवीकडून कॉलिन मुनरो (Colin Munron) याने अर्धशतकी  खेळी केली. मार्टिन गप्टिल याने 19 चेंडूंचा सामना करत 30 धावा केल्या. कर्णधार केन विल्यमसन (Kane Williamson) याने 51 धावांचा अर्धशतकी डाव खेळला. भारताच्या गोलंदाजांनी यंदा धमाकेदार खेळ केला. या सामन्यात भारताने टॉस जिंकला आणि यजमान संघाला पहिले बॅटिंग करण्याचे आमंत्रण दिले. किवींकडून रॉस टेलर (Ross Taylor) आणि मिशेल सॅंटनर अनुक्रमे 54 आणि 2 धावांवर नाबाद परतले. जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, शिवम दुबे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. मोहम्मद शमीने सर्वाधिक 53 धावा लुटलेल्या शिवाय त्याला एकही विकेट मिळाली नाही. (Career Sankat Main Hai! न्यूझीलंडविरुद्ध ऑकलँड टी-20 सामन्यातून रिषभ पंत याला डच्चू, केएल राहुल ची विकेटकीपर म्हणून निवड झाल्यानंतर चाहत्यांनी पंतला केले ट्रोल)

टॉस गमावल्यानंतर पहिले फलंदाजी करत न्यूझीलंडकडून गप्टिल आणि मुनरोने डावाची सुरुवात केली. दोघांनीही पॉवरप्लेच्या 6 षटकांत संघाच्या खात्यात विकेट न गमावता 68 धावा केल्या. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 80 धावांची भागीदारी केली. दोघे चांगली फलंदाजी करत असताना 30 धावांवर शिवम दुबेने गप्टिलला रोहित शर्माकडे कॅच आऊट केले. मुनरोने 36 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले, परंतु 42व्या चेंडूत 59 धावांची खेळी खेळल्यानंतर शार्दुलच्या चेंडूवर युजवेंद्र चहल याच्याकडे झेलबाद झाला. पुढच्याच षटकात कॉलिन डी ग्रैंडहोम खातं न उघडता रवींद्र जडेजाच्या चेंडूवर शिवमकडे झेलबाद झाला. यानंतर केन विल्यमसनने 25 चेंडूंतर भारताविरुद्ध पहिले टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पहिले अर्धशतक झळकावले, परंतु चहलच्या पुढच्या चेंडूवर तो 51 धावांवर बाद झाला.विल्यमसन आणि रॉस टेलरने चांगली भागीदारी करत संघाच्या मोठ्या धावसंख्येचा महत्वाचे योगदान दिले.

दरम्यान, न्यूझीलंडकडून या सामन्यात हमीश बेनेट ने टी-20 मध्ये पदार्पण केले. 2010 मध्ये भारताविरुद्ध टेस्ट आणि त्याच वर्षी आंतरराष्ट्रीय वनडेमध्ये पदार्पण करणाऱ्या हमीशने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले. दुसरीकडे, भारताच्याही प्लेयिंग इलेव्हनमधून रिषभ पंतला वगळले असून त्याच्या जागी मनीष पांडेला संधी दिली. पंतच्या अनुपस्थितीती सलामी फलंदाज केएल राहुल विकेटकीपिंगची जबाबदारी सांभाळेल.