IND vs ENG: टीम इंडिया ‘Fab 4’ च्या कसोटी शतकाची प्रतीक्षा, एकही शतक न करता Virat Kohli पेक्षा कोणी खेळला जास्त डाव जाणून घ्या
विराट कोहली, रोहित शर्मा, पुजारा व रहाणे (Photo Credit: Facebook, Instagram)

भारताचा (India) कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळला जात असताना प्रत्येक वेळी भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) शतकाचा उल्लेख केला जातो. याचे मुख्य कारण म्हणजे भारताच्या ‘रन मशीन’ने गेल्या दोन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही शंभरी धावसंख्या पार केली नाही. अनेक वेळा विराट शतकाच्या जवळ आला, पण प्रत्येक वेळी शतकाचा घास ओठांपर्यंत येऊनही निसटला. अर्थात, सर्व वेळ विराट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावणार नाही अशी चर्चा आहे, पण सत्य हे आहे की केवळ विराटच नाही तर सध्याच्या संघाच्या 'फॅब 4' मध्ये सामील- रोहित शर्मा (Rohit Sharma), चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे  (Ajinkya Rahane) यांच्याही कसोटी क्रिकेटमध्ये शतकाची बराच काळापासून चाहते व तज्ञ वाट पाहत आहेत. पण विराट कोहलीपेक्षा शतकी धावसंख्येचा पल्ला न गाठता कोणी जास्त डाव खेळला तुम्हाला माहित आहे का? नसेल तर मग जाणून घ्या. (IND vs ENG 3rd Test: हेडिंग्ले येथे खेळण्यात ‘विराटसेना’ अनुभवहीन, पण तिसऱ्या कसोटीत ‘या’ कारणामुळे इंग्लंडवर पडू शकतात भारी)

सर्वप्रथम विराटबद्दल बोलूया. विराटने अखेर कोलकाता येथे बांगलादेशविरुद्ध दिवस/रात्र कसोटी सामन्यात 2019 मध्ये शंभरी पल्ला सर केला होता. त्यानंतर त्याने 17 डाव खेळले आहेत, पण त्याला शतक झळकावता आलेले नाही. विराटप्रमाणेच संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेनेही ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न येथे कसोटी शतकानंतर 16 डाव खेळले आहेत पण पुन्हा शतक झळकावू शकले नाही. तसेच सलामीवीर रोहित शर्माने यंदा फेब्रुवारी महिन्यात इंग्लंडविरुद्ध चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर 161 धावा केल्या, त्यानंतर त्याने शतक न करता 10 डाव खेळले आहेत. अखेरीस या यादीत कसोटी क्रिकेटमध्ये एकही शतक न करता सर्वाधिक डाव खेळण्याचा मान ‘टेस्ट एक्स्पर्ट’ म्हणून ओळखला जाणाऱ्या चेतेश्वर पुजाराच्या नावावर आहे. कसोटी तज्ज्ञ पुजाराने दोन वर्षांपूर्वी आपल्या कसोटी कारकिर्दीतील शेवटचे शतक झळकावले होते. पुजाराने 2019 सिडनी कसोटीत 193 धावांच्या शानदार शतकी खेळीच्या जोरावर संघाच्या ऐतिहासिक विजयात महत्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतर 34 डावात पुजारा शतकी धावसंख्या पार करण्यात अपयशी ठरला.

दरम्यान, इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघ आता लीड्सच्या हेडिंग्ले येथे तिसऱ्या टेस्ट सामन्यासाठी मैदानात उतरणार आहे. तसेच लंडनच्या द ओव्हल आणि अखेरीस मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदानात अखेरचा सामना खेळणार आहे. त्यामुळे उर्वरित तीन टेस्ट सामन्याच्या सहा डावात कोणता फलंदाज शंभरी धावसंख्येचा पल्ला गाठण्यात यशस्वी ठरतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.