IND vs ENG 3rd Test: हेडिंग्ले येथे खेळण्यात ‘विराटसेना’ अनुभवहीन, पण तिसऱ्या कसोटीत ‘या’ कारणामुळे इंग्लंडवर पडू शकतात भारी
इंग्लंड विरुद्ध भारत (Photo Credit: PTI)

IND vs ENG 3rd Test: लॉर्ड्स कसोटी सामन्यात इंग्लंडवर 151 धावांनी मोठा विजय नोंदवल्यानंतर टीम इंडिया (Team India) तिसरा कसोटी सामना खेळण्यासाठी हेडिंग्ले (Headingley) येथे पोहोचली आहे आणि सरावही सुरु केला आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत आघाडी घेत विराट कोहलीचा (Virat Kohli) संघ पुढील सामन्यातही विजय नोंदवण्यासाठी उत्सुक आहे. एकीकडे भारतीय संघ (Indian Team) खूप मजबूत दिसत असताना, इंग्लंड (England) संघ पूर्णपणे कर्णधार जो रूटभोवती फिरत असल्याचे दिसत आहे. टीम इंडिया प्रत्येक स्तरावर इंग्लंडपेक्षा चांगली दिसत असली तरी एक गोष्ट जी टीम इंडियाच्या बाजूने नाही ती म्हणजे सध्याच्या संघातील कोणत्याही खेळाडूला हेडिंगले येथे खेळण्याचा अनुभव नाही. (IND vs ENG: मोहम्मद सिराजला माजी इंग्लिश गोलंदाजने म्हटले ‘ड्युरासेल बॅटरी’, फिटनेस ट्रेनरला दिला महत्त्वाचा सल्ला)

टीम इंडियाचे वरिष्ठ खेळाडू - विराट कोहली, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, इशांत शर्मा, मोहम्मद. शमी आणि आर अश्विन यांना हेडिंग्ले येथे एकही कसोटी सामना खेळण्याचा अनुभव नाही. तथापि ज्या मैदानावर तिसरी कसोटी खेळली जाणार आहे ती टीम इंडियासाठी भाग्यवान ठरली आहे. इथे भारतीय संघाचा विक्रम अधिक चांगला झाला आहे. हेडिंग्ले येथे इंग्लंडविरुद्ध 1986 पासून भारत सलग कसोटी सामने जिंकत आली आहे. हेडिंग्ले येथे इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील शेवटचा कसोटी सामना 19 वर्षांपूर्वी 2002 मध्ये खेळला गेला होता. म्हणजेच सध्याच्या संघातील एकही खेळाडू टीम इंडियाचा भाग नव्हता. अशाप्रकारे भारतीय संघाचा प्रत्येक खेळाडू इंग्लंडविरुद्ध पहिल्यांदा कसोटी सामना खेळण्यासाठी हेडिंग्लेच्या मैदानावर उतरेल. या सामन्यात जिंकण्यासाठी टीम इंडियाला प्लेइंग इलेव्हनची निवड अत्यंत काळजीपूर्वक करावी लागेल तसेच त्याच्या कामगिरीवर बारकाईने लक्ष द्यावे लागेल.

दुसरीकडे, भारत आणि इंग्लंड यांच्यातील शेवटचा कसोटी सामना 2002 मध्ये हेडिंग्ले येथे खेळला गेला, ज्यामध्ये भारतीय फिरकीपटूंनी विजयात मोठी भूमिका बजावली. अनिल कुंबळेने एकूण 7 विकेट्स घेतल्या होत्या, तर भज्जीनेही चार विकेट्स घेतल्या होत्या. तसेच भारतीय फलंदाजांनीही जबरदस्त धावा लुटल्या होत्या. अशा स्थितीत टीम इंडिया जडेजासोबत मैदानात उतरते की आर अश्विनचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.